अहिल्यानगर- महाराष्ट्रात एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातोय, तर दुसरीकडे शालेय शिक्षण व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे चक्क मराठी शाळांना टाळं ठोकण्याची वेळ आल्याचं अहिल्यानगर जिल्ह्यात दिसून येतंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवी ते सातवीच्या वर्गांना शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांवर शाळा चालवण्याची नामुष्की ओढावली आहे. खरं तर वारंवार पदवीधर शिक्षकांची मागणी करूनदेखील शिक्षक मिळत नसल्यानं वैतागून पालकांनी शाळेला चक्क कुलूप लावलंय.
पटसंख्या कमी झाल्यानं शिक्षकांची संख्या कमी: शिक्षण व्यवस्थेचं खासगीकरण झालं आणि यात सरकारी शाळांना अडचणीचे दिवस आलेत. एकेकाळी वर्गात पन्नासच्या वर पटसंख्या असलेल्या शाळा आज रिकाम्या होऊ लागल्यात. पटसंख्या कमी झाल्यानं शिक्षकांची संख्या कमी झालीय. श्रीमंत आपल्या मुलांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवतायत. मात्र दुर्गम भागातील गोर-गरिबांच्या मुलांचं शिक्षण आज ही जिल्हा परिषदेच्या शाळेवर अवलंबून आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चितळवेढे या गावातील झेडपीच्या शाळेत शिक्षक नसल्याने वर्गात विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. परिणामी, संचमान्यता मिळवण्यासाठी अडचण निर्माण झाली. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग येथे आहेत. प्राथमिकचे दोन शिक्षक सध्या सात वर्ग सांभाळत असून, माध्यमिक वर्गांना कायमस्वरूपी पदवीधर शिक्षकच नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थीच आपल्या वर्गमित्रांना अभ्यासाचे धडे शिकवतायत. वारंवार मागणी करूनही केवळ शासकीय बाबूंच्या खुर्चीत बसू केला जाणारा कारभार हा मराठी शाळेला मारक अन् खासगी शाळांना पूरक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
काही शाळांना एकच शिक्षक : सरकारी काम आणि 12 महिने थांब ही म्हण प्रचलित झालीय. मात्र राज्यातील मराठी शाळांना देण्यात येणाऱ्या सुविधा कमी आणि त्यात काही शाळांना अतिरिक्त शिक्षक, तर काही शाळांना एकच शिक्षक या धोरणामुळे पटसंख्या कमी होते आणि त्यानंतर पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जात असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. शासन गोरगरिबांसाठी की खासगी शाळांना गब्बर करण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
हेही वाचाः
Mumbai Public School : दर्जेदार अन् डिजिटल शिक्षणामुळे पालिका शाळांना 'अच्छे दिन'
पंतप्रधानांना मातृभाषेचं प्रेम लपवता येत नाही, मग आपण का मराठीचं प्रेम लपवावं : राज ठाकरे