पुणे : पुणे पोलीस युनिट एककडून पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांना ड्रग्ज संबंधित गुन्ह्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सोमवार पेठ येथे एका पांढऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला विचारपूस केली. यावेळी ड्रग्जचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी 4 कोटीचे ड्रग्स जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणी तिघांना अटक: ड्रग्ज प्रकरणातील तीनपैकी दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैभव उर्फ पिंट्या भारत माने आणि अजय अमरनाथ कोरसिया (वय 35 वर्ष, राहणार पुणे) या दोघांचा समावेश आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तिसरा आरोपी हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली. विश्रांतवाडीतील एका गोडाऊनमध्ये हे ड्रग्स ठेवण्यात आलेलं होतं. याचा संबंध आंतरराष्ट्रीय टोळीशी असल्यानं त्यासाठी तपास पथकं रवाना करण्यात आली आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांना आहे. त्या दृष्टीनं तपास सुरू झालेला आहे.
ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी 10 पथके रवाना : पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, ''यातले सगळे तपास सुरू करण्यात आले असून दहा पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. आम्हाला 'ड्रग्स मुक्त पुणे' करायचं आहे.''
बार, पब्स नियमानुसारच चालणार: ''पुण्यातील बार आणि पब हे यापुढे नियमानुसारच सुरू ठेवावे लागणार आहेत. त्यासाठीची आदेश आज जारी करण्यात येणार आहेत. रात्री दीडनंतर पुण्यातील पब चालू राहणार नाहीत. तसेच साडेदहा नंतर कुठल्याही बारमध्ये साऊंड लागणार नाही. त्याच बरोबर दारू पिण्याचे लायसन्स असेल तरच त्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे पुण्यातले पब्स आणि बार हे आता नियमातच चालू ठेवावेत, असे आदेश देण्यात येणार आहे", पुणे पोलीस आयुक्त म्हणालेत.
बाऊन्सरसंबंधी असतील 'हे' नियम: ''बार आणि पब्समध्ये जे बाऊन्सर असतात त्यांचा कुठलाही गुन्हेगारीचा रेकॉर्ड असता कामा नये. त्याची तपासणीसुद्धा केली जाणार आहे. त्या ठिकाणी महिला बाऊन्सर आणि पुरुष बाऊन्सर बरोबरीनं ठेवण्यात येतात का नाही? याचीसुद्धा कडक तपासणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणार'' असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
हेही वाचा: