नागपूर Nagpur RTO News : नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं नागपुरातील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत १ हजार ५३० बेशिस्त वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु परवाना निलंबित असताना वाहन चालक वाहन चालवताना दिसून आल्यास त्या वाहन चालकांचा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशी माहिती नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाद्वारे वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी केली जाते. जे वाहन चालक नियमांचं उल्लंघन करतात अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते. मात्र, वारंवार कारवाई केल्यानंतर वाहन चालक नियमांना धाब्यावर बसवण्याचं काम सातत्यानं करत आहे. अशा १ हजार ५३० बेशिस्त वाहन चालकांचा वाहन परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. निलंबनाच्या काळात हे चालक वाहन चालवताना रस्त्यावर आढळून आल्यास त्या वाहनाचा आणि वाहन चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे.
...तर दहा हजार रुपये दंड भरावा लागेल : जानेवारी २०२४ ते जुलै २०२४ या कालावधील ३ हजार १०१ वाहनांवर परिवहन कार्यालयाद्वारे कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर विविध गुन्ह्यामध्ये १५३० वाहनचालकांची अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसेन्स) तीन महिन्याकरीता निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या वाहन चालकांना सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यास प्रतिबंधित करण्यात आला असून, असे वाहनचालक रस्त्यावर वाहन चालवताना आढळून आल्यास दहा हजार रुपये दंड भरण्यास पात्र राहतील तसंच त्यांचं ड्रायव्हिंग लायसेन्स कायमस्वरुपी रद्द होऊ शकेल.
'या' गुन्ह्या अंतर्गत लायसेन्स झालं निलंबित : मोटार वाहन कायदा आणि केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार ड्रायव्हिंग लायसेन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धोकादायकरित्या वाहन चालवणे, दखलपात्र गुन्ह्यात वाहनाचा वापर करणे, दारु पिऊन वाहन चालवणे, ट्रॅफिक, सिग्नलचे पालन न करणे, अतिभार वाहतूक करणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, अतिवेगाने वाहन चालवणे, अपघात प्रसंगी जखमींना मदत न करणे इत्यादी विविध गुन्ह्यांसाठी वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसेन्स निलंबित करण्यात आली आहेत.
हेही वाचा