ठाणे Dombivli MIDC Blast : डोंबिवली जवळील सोनारपाडालगत 'अमुदान' केमिकल कंपनीत गुरुवारी (२३ मे) स्फोट झाला. यात दोन कंपन्या जळून खाक झाल्या. अपघातात अनेकांनी घरातील कर्तापुरुष गमाविले आहेत. शोधकार्यादरम्यान सापडलेल्या मृतदेहाची ओळखदेखील पटली नाही.
तिसऱ्या दिवशीही (शनिवारी) अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी शोध घेत असल्याचे बोलत होते. मात्र, काही तासांसाठी शोधकार्य बंद करण्यात आलं होतं अशी माहिती बेपत्ता कामगारांच्या कुटुंबियांनी दिली. त्यानंतर नागरिकांचा संताप पाहून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. शनिवारी दुपारच्या सुमारास एका कामगारांचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे जळून काळा ठिक्कर पडलेल्या मृतदेहाच्या हाताच्या दोन बोटावरून ओळख पटली आहे. राकेश राजपूत (वय ४०) असे मृतदेह सापडलेल्या कामगाराचं नाव आहे. कंपनीत काम करतानाच पूर्वी राकेश यांच्या हाताची तीन बोटे कापली गेली होती. त्यामुळं त्यांच्या बोटावरून ओळख पटली.
दोन दिवस कुटुंब कंपनीबाहेर: डोंबिवली एमआयडीसीमधील फेज दोन येथील एका कंपनीत राकेश हा कामगार गेली २५ वर्षांपासून काम करत होता. राकेश नेहमीप्रमाणे गुरुवारी कामावर गेला. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि सहा मुले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच यांच्या कुटुंबीयांनी राकेश यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईलव संपर्क होत नसल्यानं कुटुंबीय चिंतेत होते. राकेश याची कोणतीही माहिती मिळत नसल्यानं कुटुंबीयांना रडू कोसळले. गेली दोन दिवस कुटुंबीय कंपनी बाहेर उभे होते. राकेश यांच्या पत्नी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शोधकार्य बंद झाले होते. माध्यम प्रतिनिधी आल्यानंतर पुन्हा शोध कार्य सुरू झाले. आतापर्यंत १० मृतदेहासह तीन ते चार जणांचे शरीराचे काही तुकडे मिळाल्याने ओळख पटविण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
बोटांमुळं मृतकाची ओळख : शोधकार्य सुरू असताना अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांना राकेश राजपूत यांचा मृतदेह सापडला. राकेश यांच्या मृतदेहाच्या हाताला दोन बोट दिसताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. जमलेल्या नागरिकांनी राकेश यांची पत्नी आणि कुटुंबीयांना सावरले. घटनास्थळी असलेल्या सहायक पोलिस आयुक्तांनी ( डोंबिवली विभाग ) तात्काळ रुग्नावाहिका बोलावली. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ढिगाऱ्यात अडकलेला राकेश यांचा मृतदेह बाहेर काढला. राकेश यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविल्यात आला. नागरिकांचे जोवर समाधान होत नाही, तोपर्यत शोधकार्य सुरू ठेवणे आवश्यक आहे.
दहा जण बेपत्ता: अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात अमुदान कंपनीसह इतर कंपनीतील एकूण १० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता कामगारांचे नातेवाईक मानपाडा पोलीस ठाणे, शास्त्रीनगर रुग्णालय, कंपनी परिसरात जाऊन शोध घेण्याची मागणी करत आहेत. बचाव कार्यात सापडलेले सहा मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामध्ये या कामगारांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मृतदेह आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फॉरेन्सिक डीएनए चाचण्या केल्यातर जळीत मृतदेह कोणत्या कुटुंबातील आहेत, ते स्पष्ट होणार आहे. या प्रक्रिया आता सुरू असल्याची माहिती एका तपास अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा