ठाणे : भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे 'दिवाळी' आहे. दरवर्षी आश्विन आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीला दीपावली असंही म्हणतात. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध नाविन्यपूर्ण विद्युत रोषणाई दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
विविध प्रकारचे आकाशकंदील : दरवर्षी बाजारपेठेत चायनामेड वस्तूंचा बोलबाला दिसून येतो. परंतु, यंदा बाजारपेठेत 'मेड इन इंडिया' विद्युत रोषणाईची तसंच आकाशकंदीलांची मोठी मागणी आहे. तसंच मेटॅलिक, रंगीबेरंगी कापडी आणि कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, फोल्डिंगचे कंदील, साडीचे आणि खणाचे आकाशकंदील यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. आतापर्यंत चिनी बनावटीची विद्युत रोषणाई आणि आकाशकंदीलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. याचा थेट फायदा चिनी अर्थव्यवस्थेला होत होता. परंतु, सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणाचा फरक आता प्रकर्षानं जाणवू लागलाय.
'मेड इन इंडिया'ला ग्राहकांची पसंती : यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना दुकान मालक बंटी चगरा म्हणाले की, "यापूर्वी स्वस्त दरात मिळणाऱ्या चिनी बनावटीच्या मालाला ग्राहकांची पसंती मिळत होती. त्यामुळं जवळपास 80 टक्के चिनी बनावटीचा माल विकला जात होता. परंतु, आता ग्राहक जागृत झाले आहेत. भारतीय बनावटीची विद्युत रोषणाई दर्जेदार आणि टिकाऊ असल्यानं ग्राहकांचा कल आता भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईकडं जात आहे." तसंच विविध प्रकारची विद्युत रोषणाई बाजारात उपलब्ध असून आपण ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे आकर्षक आकाशकंदील आणि विद्युत रोषणाई बनवून देतो, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
- मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून दिवाळीचा फराळ निघाला परदेशात, यंदा फराळाच्या किंमतीत 25 टक्के वाढ
- मुंबईतून 176 देशांमध्ये निघाला दिवाळी फराळ; कोट्यवधींची होते उलाढाल, उद्योजकाने सांगितली 'ईटीव्ही न्यूज'ची खास आठवण