पुणे : सध्या सर्वत्र दिवाळीचा (Diwali 2024) उत्सव आहे. पुणे शहरात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गरजू मुला-मुलींसोबत आबा बागूल यांनी दिवाळी साजरी केली. गेल्या 17 वर्षापासून आबा बागूल मित्र परिवाराकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सारसबाग येथे दिवाळी फराळ, नवीन कपडे आणि फटाके देऊन या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. मुलांना पाटावर बसवून, सुगंधी उटणे आणि साबण लावून गरम पाण्यानं 'अभ्यंगस्नान' घालण्यात आलं.
दिवाळीचा लुटला आनंद : गेल्या वर्षभरापासून ज्या दिवसाची ही मुलं वाट पाहात होती तो दिवस आज उजळला. आई-वडिलांसह पदपथावर राहणाऱ्या या मुलांची सकाळ आनंददायी ठरली. माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या माध्यमातून आज रस्त्यावर राहणाऱ्या गरजू मुला-मुलींना 'अभ्यंगस्नान घालण्यात आलं. त्यांना नवीन कपडे, फटाके देण्यात आले. याआधी सकाळपासून कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वच्छता करून रांगोळ्या, सडा आणि मांडलेले पाट बघून ही मुले हरखून गेली होती. लगेच पाटावर जाऊन बसली आणि तिथं विविध मान्यवर आले आणि त्यांनी या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून त्यांचं औक्षण केलं. अभ्यंगस्नान झाल्यानंतर नवीन कपडे परिधान करण्यास दिले. या मुलांनी मिठाई खात, फटके फोडत दिवाळीचा आनंद लुटला.
मुलांसाठी शिक्षणाची सोय करावी : "आपण पाहतो की, सर्वसामान्य नागरिक दिवाळीची तयारी करत आहे. प्रत्येकजण आनंदात असून मोठ्या उत्साहानं दिवाळी साजरी करत आहे. परंतु ही मुलं भीक न मागता रस्त्यावर फुगे, खेळणी तसंच तिरंगा विकतात. म्हणजेच मेहेनत करून ही मुलं आपलं जीवन जगतात. यांना देखील दिवाळी उत्साहात साजरी करण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही आमच्या घरच्यांप्रमाणं या मुलांना अभ्यंगस्नान घालून फटाके, मिठाई देऊन दिवाळी साजरा करतो. शासनाने या मुलांना आधार देत त्यांच्यासाठी विशेष अशी शिक्षणाची सोय करावी आणि त्यासाठी येणाऱ्या काळात मी प्रयत्न करणार" असल्याचं यावेळी आयोजक आबा बागूल यांनी सांगितलं.
हेही वाचा -