अमरावती Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता जिल्हा सहकारी बँकेच्या पातळीवर राबवली जाणार आहे. या संदर्भात राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची बुधवारी चर्चा झाली असून हा निर्णय सभागृहात जाहीर करण्यात आला आहे. यामुळच अमरावती जिल्ह्यातील महिलांच्या सुविधेकरता ही योजना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं राबवली जाणार असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली आहे.
बँकेच्या 94 शाखेत उघडता येणार खातं : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यावर या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच महिलांना खातं काढावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. या योजनेकरता बँकांमध्ये खातं काढण्यासाठी आपल्या भगिनी फार गोंधळलेल्या असल्याचं ग्रामीण भागात फिरताना आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आलं. अशा परिस्थितीत या महिलांचं आर्थिक शोषण देखील केलं जात असल्याचं समोर आलं. या योजनेकरता जिल्हा बँकेत देखील खातं उघडता यावं यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी आदिती तटकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाली असून आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व 94 शाखांमध्ये महिलांना खातं काढता येईल असं अभिजीत ढेपे म्हणाले.
शंभर रुपयांत निघेल खातं : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व 94 शाखांमध्ये केवळ शंभर रुपये भरुन महिलांना बँकेचं खातं काढता येणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना किती यशस्वी होणार हे सांगता जरी येत नसलं तरी यापुढं शासनाच्या कुठल्याही योजनांसाठी महिलांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातं उपयोगी पडेल, असं अभिजीत ढेपे यांनी स्पष्ट केलं.
बँकेत गोंधळ होणार नाही : अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये महिलांकडून दोन हजार रुपये घेऊन या योजनेकरता बँक खातं काढून दिलं जातय. गरीब महिलांना असे हजार दोन हजार रुपये देऊन खातं काढणं शक्य नाही. आम्ही मात्र आमच्या जिल्हा बँकेमध्ये केवळ शंभर रुपयात महिलांना बँक खातं काढून देणार आहोत. राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण भागात नाहीत मात्र आमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 94 शाखा असून यापैकी अनेक शाखा या ग्रामीण भागात आहेत. यामुळं महिलांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते काढणे सहज सोपे राहील. आमच्या बँकेत कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही, असं देखील अभिजीत ढेपे म्हणाले.
हेही वाचा :