मुंबई Lok Sabha Election 2024 : दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या उमेदवाराला मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी बाणा दाखवला. उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावी लागणारी शपथ मराठीतूनच घ्यावी, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळं या उमेदवाराला अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळं उमेदवार झाहिद अली शेख (Zahid Ali Sheikh Application Reject) यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आझाद समाज पार्टीच्या वतीनं झाहिद अली शेख उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला त्रास देण्यात आलाय. सातत्यानं कागदपत्रं कमी असल्याचं सांगून मला परत पाठवलं जात आहे, असा आरोप शेख यांनी केलाय. त्यातच आपण एक अमराठी मुस्लिम उमेदवार असून, आपल्याला मराठी भाषा तोडकीमोडकी येते. त्यामुळं आपण उमेदवारी अर्ज दाखल करताना घेण्यात येणारी शपथ हिंदी भाषेतून घेण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. मात्र, त्यांनी मला हिंदी भाषेतून शपथ घेऊ दिली नाही. त्यांनी मला मराठी भाषा शिकून या, असं सांगितलं. त्यामुळं मी उमेदवारी अर्ज दाखल करू शकलो नाही, असं शेख यांनी सांगितलं.
उमेदवाराचा गंभीर आरोप : चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीच्या वतीनं आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र, स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी दबाव टाकल्यामुळंच आपला अर्ज दाखल करून घेतला जात नाही, असा आरोप शेख यांनी केलाय.
काय म्हणाले जिल्हाधिकारी : या संदर्भात बोलताना ॲड. नितीन सातपुते म्हणाले की, "'आझाद समाज पार्टी'चे उमेदवार झाहिद अली शेख हे मुस्लिम उमेदवार आहेत. त्यामुळं त्यांना मराठी भाषा नीट बोलता येत नाही. त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हिंदीमधून शपथ घेऊ देण्याची विनंती केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शपथ मराठीतून घ्यावी लागेल, असं सांगितलं. महाराष्ट्रात मराठी भाषेतूनच शपथ घेतली पाहिजे, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ठणकावून सांगितलं."
न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार : वास्तविक, हा उमेदवारावर अन्याय आहे. उमेदवारानं हिंदी भाषेत शपथ घेणं गैर नाही, असा दावा सातपुते यांनी केला. दरम्यान, या संदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करता येईल की नाही, याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळं आम्ही आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत', असंही सातपुते यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का :
- राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरताच भाजपाच्या नेत्यांचा निशाणा, म्हणाले... - Rahul Gandhi
- कोल्हापूर, हातकणंगले लोकसभेसाठी कोल्हापूरचे जावई केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 'जोडण्या' - lok sabha election
- ठाण्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली; नरेश म्हस्के यांच्या रॅलीत गुंडांची मारामारी - Gangster fight Naresh Mhaske Rally