मुंबई PM visit CJI House : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आरती केल्यानं विरोधकांनी हल्लाबोल केलाय. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या या कृत्यानं न्यायप्रणालीवरच शंका उपस्थित केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलंय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सगळीकडं आस्थेनं, श्रद्धेनं गणरायाचं पूजन केलं जात आहे. गौरी-गणपतीच्या दिवशी महालक्ष्मीपूजन सुद्धा होतं. अशावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडं जाऊन पंतप्रधानांनी गणरायाची आरती करत महालक्ष्मीचं पूजन सुद्धा केलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तींना ते दरवर्षी गणरायाच्या पूजेसाठी बोलावतात. परंतु, पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले आणि अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणूकाही आभाळ कोसळलं. यामध्ये फरक फक्त इतकाच आहे की, या आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित असायचे. परंतु, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर त्यावरुन इतका गहजब कशासाठी?", असा सवाल त्यांनी केला.
प्रश्न फार गहन : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागं काही वेगळं घडतंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, "हिंदुत्त्वाला विरोध करता-करता आता यांची मजल गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का जावी? प्रश्न फार गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा तसंच गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा सरसकट अपमान नाही का?", असा खडा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -