कोल्हापूर Devendra Fadnavis On Nitin Gadkari : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारनं ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. मात्र, विरोधकांनी या योजनेवरून सरकारवर सातत्याने टीका केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना "सरकारच्या भरवशावर राहू नका. सरकार हे विषकन्या असते," असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली.
योजना बंद होणार नाही : "नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी जनतेत संभ्रमावस्था पसरवू नये, गडकरी यांची बोलण्याची एक स्टाईल आहे. त्यामुळं विरोधकांनी संभ्रमावस्था पसरवण्याचं काम करू नये. आम्ही आधीच अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद केली होती. या योजनेमुळं विरोधकांच्या पोटात गोळा आल्यानं ते संभ्रमावस्था पसरवण्याच काम करत आहेत. योजना बंद होणार असं विरोधक म्हणत आहेत. मात्र, ही योजना बंद होणार नाही," असं स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले होते? : "उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. सरकार विषकन्या असतं. ज्याच्यासोबत जातं त्याला बुडवतं. त्यामुळं गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नका. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे," असं नितीन गडकरी म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंनी आधी आरसा बघावा : बाजारबुणगे आम्हाला संपवू पाहात आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी आधी आरसा बघावा. ज्या 370 कलमामुळं काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते कलम 370 मोदी आणि अमित शाह यांनी हटवण्याचं काम केलं. हिंदू म्हणून ओळख पुसण्याचा जो प्रयत्न होता, तो मोडून काढण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलं. त्यामुळं टीका करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात पाहावा."
हेही वाचा
- नरहरी झिरवळ आमच्या पक्षात या; जितेंद्र आव्हाड यांनी दिली ऑफर - Dhangar Community Reservation
- अजित पवारांच्या साथीचा महायुतीला लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही फटका बसणार? भाजपाला धास्ती - Assembly Elections 2024
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर; राज्यातील विधानसभा जागांचा आढावा घेणार - Amit Shah Mumbai Visit