मुंबई : धनगर समाजाला आदिवासी समाजातूवन आरक्षण देण्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विरोध केला आहे. आदिवासी समाजाच्या आमदारांनी आज मंत्रालयात उपोषण करत (Narhari Zirwal Jumps From Mantralaya) मंत्रालयात लावलेल्या जाळ्यांवर उड्या घेतल्या. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उडी घेतल्यानं मोठी चर्चा करण्यात येत आहे. या आमदारांना जाळीवरुन काढण्याचं काम सध्या मंत्रालयात सुरू आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू : आज राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यात सलग दुसरी बैठक होत आहे. मागील आठवड्यात धडाकेबाज 38 निर्णय राज्य सरकारने घेतले. यानंतर आजही मोठ्या प्रमाणात निर्णय होण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक आदिवासी समाजातील आमदार यांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उड्या मारत आंदोलन केले.
काय आहे आमदारांची मागणी ? : मिळालेल्या माहितीनुसार आज आदिवासी समाजातील आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना एक तासाच्या प्रतीक्षेनंतर भेटले. यावेळी त्यांनी आरक्षण आणि अन्य मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. परंतु या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. त्यापूर्वी त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ही आदिवासी समाजातील आमदारांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. ही मुख्य मागणी आदिवासी समाजातील आमदारांनी केली. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलंही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य व्हावी, यासाठी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर चढून आंदोलन केलं.
रस्त्यावर उतरण्याचा इशारा : दुसरीकडं आदिवासी समाजातील आमदारांनी आज आक्रमक भूमिका घेत मंत्रालयातील संरक्षण जाळीवर चढत आंदोलन केलं. यावेळी आदिवासी समाजातील अनेक आमदार होते. यात नरहरी झिरवाळ, भाजपाचे खासदार हेमंत सावरा यांचा सुद्धा या आंदोलनात सहभाग आहे. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. जर धनगर समाजाला एसटी पर्वर्गातून आरक्षण दिले तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आदिवासी समाजातील आमदारांनी दिला आहे. त्यामुळे आता निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना, आदिवासी समाजातील आमदार आक्रमक झाल्यामुळे यावर राज्य सरकार कोणता तोडगा काढते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले आमदार आणि खासदार : आमदार नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आमदार डॉ. किरण लहामटे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काशीराम पावरा - भाजपा, हिरामन खोसकर - काँग्रेस, राजेश पाटील - बविआ, खासदार हेमंत सावरा - भाजपा
हेही वाचा :
- नरहरी झिरवळ आमच्या पक्षात या; जितेंद्र आव्हाड यांनी दिली ऑफर - Dhangar Community Reservation
- Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन धरला संबळवर ठेका; व्हिडीओ व्हायरल
- Maharashtra Political Crisis : विधानसभा उपाध्यक्षांचा होता मेन रोल; जाणून घ्या, कोण आहेत नरहरी झिरवळ