सातारा Ajit Pawar Wai Sabha : महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना निवडून दिलं तर, जूनमध्ये नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो. जर शब्द पाळला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्यांना दिला.
एकेक खासदार दिल्लीला गेला पाहिजे : सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकारणात चार पावलं मागं पुढे करावं लागतं. उदयनराजेंना उमेदवारी मिळाली आहे. ते सातारच्या गादीचे वारस आहेत. मी आज तुमच्याकडं विकासाकरिता मते मागायला आलो आहे. एकेक खासदार मोदींना पाठिबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे, असं अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बजावलंय.
उदयनराजेंना निवडून द्या, कामाचं माझ्यावर सोडा : अजित पवार पुढं म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा खासदार निवडून देत आहात. यंदाच्या निवडणुकीत वेगळ्या चिन्हाचं बटण दाबताना तुमच्या मनात वेगळी भावना आणू नका. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना निवडून द्या, कामाचं माझ्यावर सोडा. वाई, महाबळेश्वर खंडाळ्यातून लाखाचं मताधिक्यानं निवडून दिल्यानंतर जूनमध्ये मी नितीन पाटलांना खासदार करतो. दोन खासदार झाल्यानंतर विकासकामे गतीनं होतील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.
यशवंतरावांना भारतरत्न मिळवणारच : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याची मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे. माझ्या जाहीरनाम्यात देखील ही मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करून चव्हाण साहेबांना आम्ही भारतरत्न मिळवणारच, असा ठाम निर्धार अजितदादांनी बोलून दाखवला.
हे वाचलंत का :