सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मंजूर करण्यासाठी खासगी इसमांमार्फत 5 लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील सत्र न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय निकम, आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. एक जण अनोळखी असून या घटनेमुळं न्यायपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लाच मागण्यासाठी कोडवर्डचा वापर : फिर्यादी मुलीच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून ते सध्या कारागृहात आहेत. त्यांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायालयानं फेटाळल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यावर सुनावणी सुरू असतानाच आनंद मोहन खरात हा फिर्यादीच्या पुण्यातील घरी गेला होता. सम्राट जाधव या नावानं त्यानं स्वतःची ओळख करून दिली. जामीनासाठी मदत करतो. पण, प्रोटोकॉल पाळावा लागेल, पाच डॉक्युमेंट (पाच लाख रूपये) द्यावे लागतील, असं सांगत फिर्यादीकडे पाच लाखांची मागणी केली होती.
एसीबीच्या पडताळणीत लाच मागितल्याचं स्पष्ट : पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी खासगी इसमांनी फिर्यादी मुलीला आठ दिवसांची मुदत दिली. त्यानंतर 3 डिसेंबर आणि 9 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासाठी खासगी इसमांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केल्याचं आढळून आलं. सत्र न्यायाधीश खासगी इसमांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं. तसंच त्या इसमांच्या सांगण्यावरून न्यायाधीश स्वतः फिर्यादीला भेटायला आले. मंगळवारी (10 डिसेंबर) न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्यावरून किशोर खरात, आनंद खरात आणि एक ओळखी इसम हे फिर्यादी मुलगी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये लाच स्वीकारण्यासाठी गेले होते.
लाचेची रक्कम कोर्टात पाठवून द्यायला सांगितली : हॉटेलमधून पैशाची बॅग घेऊन जाण्याच्या तयारीत असताना खासगी इसमांना संशय आला. तुमच्या माणसालाच पैसे घेऊन कोर्टात पाठवा, असं फिर्यादीला सांगून ते निघून गेले. त्यानंतर फिर्यादी मुलीनं स्वतः कोर्टात जाऊन डायसवरील न्यायाधीश धनंजय निकम हेच आपल्याला भेटायला आल्याचं ओळखलं. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात सत्र न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा