बीड BSNL Sim Demand Increase : महिन्याभरापूर्वी खासगी टेलिकॉम कंपन्यांनी अचानक रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. त्या नाराजीतून ग्राहकांनी धडाधड सिम पोर्ट करत आपला निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांमध्ये बीएसएनएल कंपनीकडं सर्वाधिक सिम पोर्ट करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं. असं असतानाच आता जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आणि ग्रामीण भागात बीएसएनएल आपली 5G सेवा विविध ऑफर्ससह उपलब्ध करून देणार असल्याचं बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं ग्राहक मोठ्या प्रमाणात बीएसएनएलचे सिम कार्ड खरेदी करत असल्याचं बघायला मिळतय.
बीडमध्ये बीएसएनएलच्या सिम कार्डचं वाटप : बीडच्या आष्टी तालुक्यात बीएसएनएल 5G या सिम कार्ड सेवा 15 ऑगस्टपासून सुरू होत असून ग्राहकांची याला मोठी पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतेय. बीएसएनएलच्या 5G सिम कार्डचं वाटप कनिष्ठ दूरसंचार अधिकारी राहूल खेडकर यांच्या उपस्थितीत आष्टीतील बीएसएनएल सिम विक्रेते प्रितम बोगावत, सुनिल नरवडे यांच्या वतीनं करण्यात आलं.
बीएसएनएल ग्राहकांची प्रतिक्रिया : बीएसएनएलच्या नवीन ऑफर्सविषयी तसंच सुविधांविषयी ग्राहकांशी संवाद साधण्यात आला असता त्यांनी समाधान व्यक्त केलं. खासगी कंपन्यांनी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ग्राहकांना ऑफर दिल्या. पण त्यानंतर त्यांनी ग्राहकांना लुटलं. बीएसएनएल ही सरकारी कंपनी असून त्यांची 5G सेवा 15 ऑगस्टला सुरू होत आहे. बीएसएनएलचे सिम कार्ड वाटप सुरू झाले आहे. त्यामुळं मी राज्यातील जनतेला आवाहन करेल की त्यांनी बीएसएनएलची सुविधा घ्यावी, अशी प्रतिक्रिया एका बीएसएनएल ग्राहकानं दिली. तर बाजारात असलेल्या इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्ज दर 300 ते 350 अशा मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. मात्र, बीएसएनएलकडून 100 ते 150 रुपयांत एक महिन्याचं रिचार्ज देण्यात येतय. तसंच विविध सुविधांसह आता बीएसएनएल 5G सुविधाही सुरू करत आहे. त्यामुळं नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असंही एका ग्राहकानं म्हटलंय.
5G व्हिडिओ कॉल चाचणी : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच बीएसएनएलच्या 5G नेटवर्कची चाचणी केली. यावेळी त्यांनी 5G चा उपयोग करून व्हिडिओ कॉल केला. या यशस्वी चाचणीनंतर वापरकर्त्यांसाठी 5G नेटवर्क लवकरच रोलआउट होऊ शकेल, असं ते म्हणाले. याशिवाय बीएसएनएलची 5G क्षमता दाखवणारा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा -