मुंबई Graduate Constituency Election : मुंबई पदवीधर मतदार संघातून महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार (Kiran Shelar) यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने नुकतीच जाहीर केलीय. मात्र, या मतदारसंघातून आपण गेली अनेक वर्ष काम करीत असून या मतदारसंघातून आपण सातत्यानं विजयी होत आलो आहोत. यावेळी सुद्धा आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असल्याचं आपण मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. तसेच आपण उमेदवारी अर्ज सुद्धा भरून तयार आहोत अशी माहिती, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी दिलीय.
मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय मान्य : या मतदारसंघातून आपले काम असून आपण आतापर्यंत अनेक मतदार तयार केले आहेत. आपल्याकडं मतदारांची संख्या अधिक आहे. कुणाचे किती मतदार आहेत हे शेवटी आकडेवारीवरून लक्षात येईलच, मात्र या मतदारसंघावर आपली पकड असून पदवीधर कोणाला कौल देतात हे महत्त्वाचं आहे. या मतदारसंघातील उमेदवारीबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर बोलून जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. मात्र सध्यातरी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असं डॉ. सावंत यांनी स्पष्ट केलंय.
विरोधी उमेदवाराची चिंता नाही : मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ॲड. अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र आपल्यासमोर कोणता उमेदवार आहे याने आपल्याला काहीच फरक पडत नाही, या निवडणुकीत रणनीतीने जो लढतो तो जिंकतो आणि ही सुसंस्कृत अशी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित होईल असेही सावंत यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -