मुंबई Devendra Fadnavsi Resign Issue : केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील सर्व भाजपा आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव मांडण्यात आले. पहिला ठराव हा पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा होता. तर दुसरा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पिछेहाटीनंतर जी भूमिका मांडली आहे, ती त्यांनी परत घ्यावी याबद्दल होता; परंतु या ठरावानंतरसुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने अजूनही देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा : देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्रातील पराभव अतिशय जिव्हारी लागला असल्या कारणाने त्यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच उत्तर प्रदेश या ठिकाणी भाजपाचा जो धोबीपछाड झाला आहे. त्यातून नेत्यांना सावरणं फार कठीण आहे. या दोन राज्यातील पराभवाने केंद्रातील भाजपाची समीकरण बदलली गेली आणि त्यांना नितेश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. याकरिता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाची झालेली हानी भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पूर्णवेळ पक्षासाठी देता यावा म्हणून त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडवणीस यांनीसुद्धा आजच्या बैठकीत पक्षाला या पराभवातून सावरत जोमाने कशा पद्धतीने पुढे नेता येईल, विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा कसा फडकवता येईल, याबाबत उपस्थित नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर राज्यातील नेत्यांनी, आमदारांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले; परंतु पक्षाकडून मांडण्यात आलेल्या ठरावावर त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही किंवा आपला निर्णय बदलला असल्याचंही सांगितलं नाही.
कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम : देवेंद्र फडवणीस सरकारमध्ये राहूनच चांगल्या प्रकारे पक्ष मजबूत करू शकतात अशी अनेक भाजपाच्या नेत्यांची, आमदारांची इच्छा आहे. देवेंद्र फडवणीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये या मतांवर ते सर्व ठाम आहेत. त्यातच जर देवेंद्र फडणवीस यांच्या जागी इतर कोणाची वर्णी लागली तर महायुतीच्या घटक पक्षांवर असलेला भाजपाचा दबदबा कमी होईल, अशी भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊ नये या मतावर अमित शाहसुद्धा ठाम आहेत. जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर त्याचा परिणाम राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबळावरसुद्धा होईल, असंही अमित शाह यांना वाटतं. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी आटोपल्यानंतर या विषयावर पुन्हा एकदा केंद्रात सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी सध्यातरी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
हेही वाचा :
- नीट परीक्षेची सीबीआय चौकशी करा; शिक्षक, पालकांची मागणी - Neet Exam
- उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - Devendra Fadnavis
- मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet