मुंबई SIT Probe In Badlapur Rape Case : बदलापूर इथल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचं प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. या प्रकरणी पालकांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर चिघळलेल्या या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून ( एसआयटी ) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या आय पी एस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
#बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 20, 2024
आरती सिंह यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना : बदलापूरक इथल्या एका विद्यालयात चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आज सकाळी पालकांनी एकत्र येत बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागली असून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी रेल्वेच्या ट्रॅकवर ठिय्या मांडल्यानं रेल्वेसेवा कोलमडली आहे. कतोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे.
कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा संताप : बदलापूर इथल्या एका विद्यालयात शिकणाऱ्या चार वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या शाळेत ही घटना घडली, तिथली संपूर्ण चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार आहोत. दोषींवर कटोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…
पीडित कुटुंबाला 11 तास ताटकळत ठेवणाऱ्यांवर कारवाई करा : बदलापूर इथल्या चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आल्यानं पीडित कुटुंबीयांना धक्का बसला. मात्र लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडितांना 11 तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. "पीडित कुटुंबीयांची तक्रार दाखल करुन घेण्यास तब्बल 11 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. हे प्रकरण जलद गतीनं चालवून 3 महिन्यात तपास पूर्ण करावा," अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा :