शिर्डी : दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री दत्त जयंती साजरी केली जाते. शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्त मूर्ती ठेवून 'दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लव दिगंबरा' असं गुणगान गायलं जातं. सांध्यकाळी 6 वाजता श्रीदत्त जन्माचा उत्सव साई मंदिरात साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली आहे. साईबाबांना श्रीदत्त अवतार मानत या पावन दिवशी, साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आज भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.
साईबाबांच्या मंदिरात दत्त जन्म उत्सव : आज दिवसभर साई समाधीवर श्रीदत्त यांचा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात येणार आहे. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लीला दाखवल्या असं सांगतात. जगातील एकमेव अशी मस्जिद जिला द्वारकामाई म्हणून संबोधलं जातं, ती शिर्डीत आहे. या ठिकाणी अनेक भक्त बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी पाहण्यासाठी आजही येतात. बाबा हेच आमचे राम, रहिम, कृष्ण, दत्त, विठ्ठल असं भाविक म्हणतात. तर विविध रुपात बाबा दर्शन देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
फुलांची आकर्षक सजावट : आज साईबाबांना सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आल्यानं, साई साक्षात श्रीदत्त रूप दिसत आहेत. दत्त जयंतीमुळं भाविकांना साईंच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथील रजनी डांग या साई भक्त महिला आपल्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिर चावडी, द्वारकामाई गुरूस्थान, साई मंदिर परिसरातील दत्त मंदिरासह परिसराला फुलांची आकर्षक सजावट करतात.
श्रीदत्त जयंतीचं महत्त्व : श्रीदत्त जयंती दिवशी भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यानं प्रलंबित कामं पूर्ण होतात असं म्हणतात. संतानप्राप्तीच्या इच्छेसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते, असं मानण्यात येतं.
हेही वाचा -