मुंबई Dahi Handi 2024 : मुंबई आणि उपनगरात दहीहंडीचा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातोय. प्रत्येक रस्त्यावर गोविंदा पथक बघायला मिळताय. जास्तीत जास्त थर लावून हंडी फोडण्याचा आणि जास्तीत जास्त रकमेची बक्षिसं मिळवण्याचा गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. तर काही गोविंदा पथकांकडून सामाजिक भान राखत विविध देखावे सुद्धा या उत्सवादरम्यान सादर केले जातात. मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतोय. मात्र, गेल्या काही वर्षात या उत्सवांमध्ये आयोजकांकडून मोठ्या रकमेची बक्षिसं जाहीर केल्यानंतर उत्सवाचं रूप पालटू लागलंय. अलीकडं तर काही दहीहंडी संयोजकांनी नट, नट्या आणि सेलिब्रिटी यांना आपल्या उत्सवात बोलावून उत्सवाची रंजकता वाढवण्याचा प्रयत्न केलाय. इतकंच नाही तर आता वेगवेगळ्या नट,नट्यांची नृत्यही उत्सवाच्या ठिकाणी आयोजित केली जातात.
महाराष्ट्रात सध्या सगळीकडं गाजत असलेल्या गौतमी पाटीलचा नृत्य अविष्कार (Gautami Patil Dahi Handi Dance) सध्या बोरिवली येथे प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान पाहायला मिळतोय. गौतमी पाटीलचे हावभाव आणि नृत्य तसंच तिच्या प्रमाणेच अन्य नृत्यांगरांचे हावभाव आणि नृत्य हे बीभत्स असून आपल्या परंपरेला आणि प्रथेला शोभणारे नाहीत, अशी भावना गोविंदा पथकांमधून व्यक्त होत आहे.
कोणत्या दहीहंडी उत्सवात कोण येणार? :
आपल्या दहीहंडी उत्सवामध्ये जास्तीत जास्त पथकांनी आणि दर्शकांनी उपस्थित रहावं यासाठी आयोजकांकडून नट्यांना प्राचारण केलं जातं. त्यासाठी लाखो रुपये काही अवधीसाठी मोजले जातात. मराठीतील अभिनेते, अभिनेत्री यांना पाच ते सात लाख रुपये तर बॉलीवूडमधील नट नट्यांना वीस लाखांपर्यंतची रक्कम दिली जाते.
- दादर मध्ये कोण? : दादर येथील आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीला यंदा मिस्टर एशिया रोहन कदम अभिनेता भूषण गाडी आणि मिस्टर इंडिया सुहास खामकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिव्यांग आणि दृष्टीहीन गोविंदा पथकसुद्धा बघायला मिळतील. तसंच मुलगी पसंत आहे आणि दुर्गा मालिकेतील कलाकारांचीही या ठिकाणी हजेरी लागणार आहे.
- बोरिवलीत कोण? : बोरिवली देवीपाडा येथील दहीहंडी उत्सवाला विकी कौशल, करिष्मा कपूर मराठी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांची हजेरी लागणार आहे. तर प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलच्या नृत्यासह अनेक कलावंत हजेरी लावणार आहेत.
- कुर्ल्यात कोण येणार? : कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला महाराष्ट्राची हास्य जत्रेतील वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे यांच्यासह भाऊ कदम, गौरी जाधव, मेघा घाडगे, हेमलता बाणे हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.
- ठाण्यात येणार कोणते अभिनेते? : ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला प्रसाद ओक, मंगेश देसाई, क्षितिज दाते उपस्थित राहणार आहेत. तर धर्मवीर दोन चित्रपटाची टीम ठाण्यानंतर पुण्यातही जाणार आहे.
आजचे खरे हिरो गोविंदाच : दरम्यान या सर्व उत्सवाबद्दल बोलताना दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष अरुण पाटील म्हणाले की, "आजचा सण आणि उत्सव हा खऱ्या अर्थाने गोविंदांचा आणि गोविंदा पथकांचा आहे. जास्तीत जास्त दहीहंडी फोडणे आणि या उत्सवाचा खेळाचा आनंद घेणे हे आमचे उद्दिष्ट असते. त्यासाठी अनेक दिवस आम्ही सराव करीत असतो. परंतु दहीहंडी आयोजक जेव्हा मोठमोठ्या कलावंतांना बोलावून नृत्याचे कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा आमच्या पथकांचा वेळ जातो. वास्तविक लोक आम्हाला पाहायला आलेले असतात. आजच्या दिवसाचे खरे हिरो हे गोविंदाच आहेत. मात्र हे आयोजकांच्या लक्षातच येत नाही. त्याशिवाय अलीकडे ज्या पद्धतीने नट नट्या नाचवून या उत्सवात बीभत्सपणा आणला जातो आहे. त्यामुळं उत्सवाची शालिनता आणि परंपरा नष्ट होत आहे." तसंच आपली संस्कृती जपण्याचा आयोजकांनी प्रयत्न करावा, असंही ते म्हणाले.
केवळ राजकारणासाठी दहीहंडीचे आयोजन : मुंबईमध्ये सर्वात आधी ज्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन सुरू झाले. त्यामध्ये सचिन अहिर यांच्या वरळी येथील दहीहंडी उत्सवाचा समावेश होता. मात्र, सध्या आयोजित होत असलेल्या उत्सवाबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, "अलीकडं जे आयोजक अचानक जन्माला आलेत. ते केवळ राजकारणासाठी आले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातंय. त्यातही परंपरा आणि संस्कृतीला धक्का लावला जातो. त्यामुळं मुंबईच्या उत्सवाची शान आणि परंपरा कायम राखली जावी."
हेही वाचा -
- साईनगरीत गोकुळाष्टमीची धूम, साईभक्तांनी दहीहंडी फोडत उत्सव केला साजरा - Shirdi Saibaba Dahi Handi
- ढाक्कू माक्कूम ढाक्कू माक्कूम! गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यास सज्ज, भाजपा नेते किरीट सोमैयांनी फोडली हंडी - Dahi Handi Festival 2024
- गोविंदा आला रे... आला..., 'या' आहेत मुंबईच्या प्रसिद्ध दहीहंड्या - Dahi Handi 2024