छत्रपती संभाजीनगर Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी होत आहे. खरंच या योजनेचे पैसे खात्यावर आले की नाही, हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी केलीय. तर अर्ज करणाऱ्या अनेक महिलांच्या बँक खात्याचे केवायसी झालेली नाही. त्यामुळे देखील महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे.
महिलांनी केली गर्दी : मोठा गाजावाजा करत 'माझी लाडकी बहीण' ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केली. त्यावर अनेक वेळा टीकाटिप्पणीदेखील झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनआधी दोन महिन्यांचे पैसे प्रत्येक बहिणींच्या खात्यात जमा होतील, असा शब्द दिला होता आणि त्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांमध्ये पाहायला मिळाला. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यांमध्ये अद्यापही पैसे आले नाहीत, त्यामुळं त्यांनी थेट बँक गाठली. त्यात पुढील दोन दिवसात अन्य महिलांचे पैसे येतील. मात्र, ज्यांच्या खात्याचे केवायसी झालेले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिलांना देण्यात आली आहे. तर केवायसी करण्यासाठी महिलांनी सुविधा आणि मदत केंद्रावर रांगा लावल्या आहेत.
नवीन नोंदणीसाठी महिला बँकेत : गुरुवार आणि शुक्रवारी महिलांच्या खात्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजनेचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. महिला एकमेकांना आपले पैसे आल्याचं सांगत आनंद व्यक्त करत आहेत. त्यामुळं ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्यांनी बँकेकडे धाव घेतली. आपलं नाव नोंदवण्यासाठी त्यांनी बँकेत रांगा लावल्या आहेत. या योजनेत खरेच पैसे येतील का? असा संभ्रम असल्यानं अनेक महिलांनी अर्ज केला नव्हता. मात्र आता अर्ज केलेल्या इतर महिलांच्या खात्यात रक्कम आल्याचं पाहून आपली राहिलेली नोंदणी करण्यासाठी आपण बँकेत आल्याची माहिती अनेक महिलांनी दिली.
योजनेचा निवडणुकीत फायदा होणार का?: दोन दिवसात ज्या भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले ते खात्यातून काढण्यासाठी एटीएम आणि बँकेत गर्दी दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची चर्चा घराघरात पाहायला मिळतेय. त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मतदानाच्या रुपात होईल का, यावर आता चर्चा झडायला सुरुवात झालीय.
हेही वाचा -
- "संतांच्या आशीर्वादामुळंच राज्याचा कारभार, त्यांच्या केसालाही धक्का..." महंत रामगिरी महाराजांसमोर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - mahant ramgiri maharaj News
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती आले पैसे ? - Ladki Bahin Scheme Money Credited
- राज्य सरकारनं 'बारकं लेकरू योजना' आणावी, कार्तिक वजीरचं भाषण व्हायरल - Kartik Wazir