अमरावती Salbardi Yatra : महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri 2024) पर्वावर सातपुडा पर्वत रांगेत जंगलामध्ये 'हर महादेवाच्या जयघोषात' रोज लाखो भाविक गुफेमध्ये असणाऱ्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई तालुक्यात सालबर्डी या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेत महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात. या यात्रेवर मध्य प्रदेश सरकारचं नियंत्रण असलं तरी संपूर्ण यात्रेवर महाराष्ट्राची छाप उमटलेली दिसते.
छोटा महादेव म्हणून सालबर्डी प्रसिद्ध : मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असणारं पचमढी या ठिकाणी मोठा महादेव असून छोटा महादेव सातपुडा पर्वतरांगेतील सालबर्डीच्या गुफेत असल्याची मान्यता आहे. सालबर्डी येथील पहाडात असणाऱ्या अनेक गुफांपैकी काही गुफा या थेट पचमढीला जातात असं म्हटलं जातं. पचमढीला जाणाऱ्या भाविकांना सालबर्डी येथील महादेवाचं दर्शन करणं अनिवार्य असल्याचं सांगितलं जातं. ज्यांना पचमढीला जाणं शक्य नाही त्यांनी सालबर्डीत महादेवाचं दर्शन घेणं भाग्याचं आहे, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.
दोन नदीच्या संगमावर भरते यात्रा : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशातील सालबर्डी हे गाव आहे. या गावातील काही घरं ही मध्य प्रदेशातील मुलताई तालुक्यात येतात तर काही घरं महाराष्ट्रातील मोर्शी तालुक्यात आहेत. सालबर्डी लगत सातपुडा पर्वत रांगेत माडू आणि गडगा या नदीच्या संगमावर महाशिवरात्रीच्या पर्वावर ही यात्रा भरते. पहाडावरून उंच ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या गुफेत जाताना माडु नदी बाजूला खोऱ्यातून वाहते. यात्रेच्या दरम्यान कुठलाही अपघात घडू नये यासाठी या नदीच्या काठावर मध्य प्रदेश पोलिसांच्या वतीनं बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. माडू नदीत असणारा हत्तीरोह हे ठिकाण प्रसिद्ध असून यात्रे दरम्यान या ठिकाणी जाण्यास बंदी असते.
पुरातन स्थान म्हणून आहे सालबर्डीचं महत्त्व : सालबर्डी येथील सातपुडा पर्वताच्या उंच टोकावर एका गुफेमध्ये प्राचीन असे शिवलिंग आहे. हे शिवलिंग अतिशय पुरातन असल्याचं मानलं जातं. भुयारामध्ये सुमारे 100 फूट आतमध्ये उतरल्यावर महाकाय दगडाच्या आतल्या पोकळीत सपाट असणाऱ्या जागेवर शिवलिंगाचं दर्शन होतं. या पहाडावर भुयारातील या शिवलिंगासह मुक्ताबाईचं मंदिर, मौन्या देवाचं मंदिर आहे. महाभारत काळात पांडव या भागात वास्तव्याला होते. त्यामुळं या ठिकाणी पांडव कचेरी देखील छान आहे. भुयारातील शिवलिंगासह या सर्वच ठिकाणांच्या यात्रेत येणारे भाविक दर्शन घेतात. अतिशय पुरातन धार्मिक स्थळ म्हणून सालबर्डी हे ठिकाण ओळखलं जातं.
बोरकुट आणि बिबे आहे प्रसिद्ध : मुलताई, पट्टण, आरणे या मध्य प्रदेशातील जंगलात बिब्यांची झाड मोठ्या संख्येत आहे. यासह या भागातील आदिवासी बांधव बोर वेचून त्याचं बोरकुट तयार करतात. येथील 'बोरकुट' अतिशय चविष्ट असून सालबर्डीच्या यात्रेत मोठ्या संख्येनं बोरकुटची विक्री होते. महादेवाच्या दर्शनासोबतच या यात्रेतून बोरकुट खरेदी करण्यास देखील अनेक जण महत्व देतात. बोरकुट सोबतच या यात्रेत बिबे आणि बिब्याच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. आयुर्वेदिक असणाऱ्या बिब्याच्या फुलांमुळं कुठलाही प्रकारचा वात बरा होतो. यासह डांग्या खोकला, साधा खोकला कफ, दमा अशा विकारांवर देखील बिब्याची फुलं ही गुणकारी औषध असल्याची माहिती, या यात्रेत गत साठ वर्षांपासून नियमित येणारे आनंद माहुरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मध्यप्रदेश सह महाराष्ट्र पोलीस तैनात : महाशिवरात्रीच्या पर्वावर सुरू होणारी ही यात्रा पुढे पंधरा दिवस चालते. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यासह विविध भागातून भाविक सालबर्डीला महादेवाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून देखील अनेक भाविक सालबर्डीच्या यात्रेत येतात. या यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्यप्रदेश पोलीस जागोजागी तैनात आहेत. ज्या ठिकाणावरून यात्रेला सुरुवात होते तो भाग अमरावती जिल्ह्यात येत असल्यामुळं या भागात महाराष्ट्र पोलीस तैनात आहेत.
यात्रेवर ग्रामीण संस्कृतीची छाप : सालबर्डी येथील यात्रेत मुलांना खेळण्यासाठी आकाश पाळणे आणि इतर क्रीडा साहित्य असलं तरी या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दोन किलोमीटर उंच पहाड चढून तो खाली उतरणं ही कसरत आहे. या यात्रेवर पूर्णतः ग्रामीण संस्कृतीची छाप पडलेली दिसते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येनं येतात. हातात भला मोठा त्रिशूल घेऊन अनेक तरुण महादेवाचा जयघोष करीत पहाड चढतात आणि उतरतात. महादेवाचं गाणं म्हणत विविध गावातील भाविक मोठ्या उत्साहात सालबर्डीचा पहाड चढतात.
हेही वाचा -