मुंबई Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदार-खासदारांना पुन्हा निवडून आणण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत भाजपाकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. भाजपाकडून शिंदे गटाकडं असलेल्या जागांबाबत दबाव असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं शिंदे गटात अंतर्गत असंतोष असून, ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंडाच्या तयारीत आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर दुहेरी संकट उभं आहे. आपल्या खासदारांची तिकिटं वाचवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागणार आहे. तसंच शिवसेना भाजपाच्या हातातील बाहुली नसल्याचा स्वाभिमानी बाणा शिंदेंना कायम ठेवायचाय. ठाकरेंविरुद्धचं बंड जितकं आव्हानात्मक होतं, तितकाच आव्हानात्मक प्रश्न शिवसेना तसंच भाजपा यांच्यात जागावाटपा आहे. कारण या वाटाघाटीत यश आलं तरच सोबत आलेले आमदार-खासदार यांना लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत संधी देता येणार आहे. अन्यथा आमदार-खासदार वेगळा निर्णय घेऊ शकतात.
शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. त्यातील 18 जागांवर शिवसेनेचा विजय झाला होता. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बंडखोरीनंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. महायुतीतील जागावाटपाचा वाद अद्याप सुटलेला नाही. सुरुवातीला भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना भाजपा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर जागावाटपाच्या वेळी भाजपानं अनेक जागांवर दावा केलाय. शिवसेनेनं हिंगोली तसंच हातकणंगले जागेसाठी उमेदवार जाहीर केली आहे. मात्र, या जागांसाठी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे, असे संकेत शिंदे गटाचे (शिवसेना) आमदार संजय शिरसाठ यांनी दिले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त केल्यानं उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या जागेसाठी दुसरा उमेदवार हवा असल्याचं भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितलंय. शिवसेनेचे सध्या नाशिक, कल्याण, ठाण्यात खासदार आहेत. मात्र, या जागांवरही भाजपाची नजर आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, असा देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. कल्याण तसंच ठाण्यातही भाजपा आपल्या उमेदवाराची चाचपणी करत आहे. त्यामुळं शिवसेनेसमोर या जागा राखण्याचं मोठं आव्हान आहे.
शिवसेनेत असंतोष : लोकसभेच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेल्या वाटाघाटींवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. दुसरीकडं हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेथून उमेदवार बदलण्याची शक्यता असल्यानं हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तिथं विद्यमान अन्न नागरी पुरवाठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं हेमंत गोडसे बंड करू शकतात, असंही बोललं जात आहे. हातकणंगले जागेसाठी धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी ही जागा बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं माने यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत जागावाटपावरून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याच दबावामुळं शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एकनाथ शिंदे आव्हान पेलणार : खासदारकीचं तिकीट मिळवणं, तिकीट मिळाल्यानंतर निवडून येणं, असं दुहेरी संकट एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. यावर बोलताना शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं, 'सध्या शिवसेना भाजपामध्ये जागावाटपावरून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पण, वर्षानुवर्षे एका जागेवर एकाच पक्षाचा खासदार असतो. तिथं आता दुसऱ्या पक्षाचा खासदार असावा, अशी महायुतीतील प्रत्येक पक्षाची भावना आहे. जास्तीत जास्त खासदार आपल्या पक्षाचे असावेत, असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, सध्या आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे या सर्वांना तिकीट देऊन निवडून आणतील यात शंका नाही', असं मनीषा कायंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
...अन्यथा त्यांनी शेती करावी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली, तेव्हा 40 आमदार, 13 खासदार त्यांच्यासोबत गेले. त्यामुळं त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी घेतली होती. जर माझ्यासोबत आलेले खासदार, आमदार निवडून न आल्यास मी गावी जाऊन शेती करेन असं शिंदे म्हणाले होते. आता शिंदे गटाला काही ठिकाणी चांगले उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळं त्यांची लायकी कळते, असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे. दुसरीकडं, विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. ज्या जागांवर ते खासदार आहेत, त्या जागांवरही भाजपा दावा करत आहे. शिंदे यांना यातून त्यांची ताकद महत्व कळतंय, अशी टीकाही अनिल परब यांनी केली आहे. एकनाथ शिंदे आमदार-खासदारांना निवडून आणत नसतील, तर त्यांनी गावी जाऊन शेती करावी, अशी टीका अनिल परबा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हे वाचलंत का :