छत्रपती संभाजीनगर Cracks on Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गाला चक्क तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गोलवाडी येथे संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळं कामाच्या दर्जावर प्रश्नचिवन्ह निर्माण झालं आहे. प्रती किलोमीटर 1.70 पैसे टोल आकारला जात असताना माहामार्गाला तडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मार्गाच्या बांधकामाबाबत समाज माध्यमांवर नागरिकांनी टीका सुरू केली आहे. त्यानंतर तडे गेल्याची माहिती उघड होताच एमएसआरडीसीनं पाहणी करून डागडुजी सुरू केली आहे. मात्र, निकृष्ट काम सरकारच्या नजरेस कसं पडलं नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रस्त्याला गेले तडे : समृध्दी महामार्ग राज्य सरकारनं घोषित केलेला प्रतिष्ठेचा प्रकल्प समजला जातो. नागपूर मुंबई हे अंतर अवघ्या काही तासात पूर्ण करण्यासाठी अतिशय वेगवान महामार्ग म्हणून याकडं पाहिलं जातं. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून वेगात काम पूर्ण केलं गेलं होतं. वेगवेगळ्या टप्प्यात काम पूर्णत्वाकडं नेलं गेलं. जसं जसं काम होत गेलं, तसा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला गेला. काम पूर्ण नसताना तो खुला केल्याबद्दल अनेकवेळा सरकारवर टीका देखील झाली. मात्र, त्याकडं केंद्र सरकारसह राज्य सरकारनं कानाडोळा केला. त्यातच या महामार्गावर तडे गेल्याचा धक्कादायका प्रकार समोर आला. जवळपास तीन ते चार सेंटिमीटर रुंदीचे तडे गोलवाडी जवळ पडले आहेत. या तड्यांमधे खडी आढळून आल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना जवळपास 1.70 पैसे इतका टोल आकारला जातो. इतके पैसे देऊनही महामार्गाचं काम चांगलं कसं झालं नाही, असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.
तातडीनं दुरुस्ती सुरू : या रस्त्याचं निकृष्ट काम समोर येताच एमएसआरडीसीनं आपल्या अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवलंय. त्यांनी रस्त्याची सखोल पाहणी करून अवघ्या काही वेळात दुरुस्ती सुरू केली. यावेळी अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र रस्त्यांच्या भेगा पाहून तातडीनं त्या भरण्याच्या कामाला सुरुवात केली. रस्ता तयार करताना पुढील वीस वर्षे तरी रस्त्याला काही होणार नाही, अशी माहिती रस्ते विकास महामंडळानं दिली होती. त्यासाठी दर्जेदार सिमेंट, खडी वापरल्याचा दावा करण्यात आला. मात्र, रस्त्यावरील तडे पाहून दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं. आता सरकार या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करणार का, हा प्रश्न आहे. तर विरोधक याविषयी सरकारला धारेवर धरणार हे नक्की.