बीड : सध्या राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. या लाटेमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. अनेक तरुणांना, महिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत यामागे कोरोना लस कारणीभूत आहे का? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आता यावर बीडचे हृदयरोग तज्ञ डॉ. संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
कोरोना लसीमुळं मृत्यू होण्याची शक्यता : "कोरोना लस ही माणसाला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी दिली होती. मात्र, ही लस काही लोकांना एलर्जिक ठरली असल्याचं निदर्शनास आलं. हृदयाची जी आवरणं असतात, त्याला मायकॉर्डिंग असे म्हणतात. त्या हृदयाच्या असलेल्या अवयवाला इजा होऊन हृदयाचे कंपन, हृदयाची गती, रक्तपुरवठा याच्यावर त्याचा परिणाम होतो. तर आपल्याला याची लक्षणे लगेच जाणवत नाहीत. परंतु, याचा परिणाम हळूहळू हृदयावर होतो. अचानक एखादे जड काम केल्यास हृदयाचा अचानक त्रास होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता अधिक असते. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात काही प्रमाणात व्यक्तींना कोरोना लसीमुळं दुष्परिणाम झाल्याचं निदर्शनास आलं होतं," अशी माहिती डॉ. संजय राऊत यांनी दिली.
"कोरोनाची लस घेतली होती. त्याला इतर कुठलाही आजार नव्हता. मात्र, त्याच्या छातीत दुखल्यामुळं तो अचानक दगावला, अशी आपल्याला माहिती मिळते. मात्र, आपल्याकडं त्याची संपूर्ण माहिती नसते. तो व्यक्ती काही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो त्या ठिकाणी केलेल्या तपासण्यांमध्ये काही प्रमाणात कोरोना लसीमुळं दगावल्याचं दिसून येत आहे." - डॉ. संजय राऊत
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात : "थंडीचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होतो. थंडीमुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं हृदयाचा त्रास होण्याची शक्यता असते. हृदयामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या थंडीत आकुंचन पावतात. ज्या व्यक्तींना हृदयाचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशी व्यक्ती जर अचानक थंडीत गेली तर त्यांची बॉडी लगेच रिस्पॉन्स करते. जर पेशंटची एंजियोग्राफी केली असेल तर त्यामध्ये ब्लॉकेजेस आढळतात. तसंच ज्या लोकांना पूर्वीपासून शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास आहे, अशा लोकांना सुद्धा थंडीमुळं आणि कोरोना लस घेतल्यामुळं त्रास होत आहे," अशी माहिती डॉ. संजय राऊत यांनी दिली.
टीप : डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून वरील माहिती पुढे आली. लसुीमुळं काही प्रमाणात अशा घटना होत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. वरील माहितीची 'ईटीव्ही भारत' पुष्टी करत नाही. आरोग्याबाबत काही समस्या जाणवत असल्यास रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्यावेत व घाबरू नये.
हेही वाचा -