मुंबई Sanjay Nirupam : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून (ठाकरे गटानं) या मतदारसंघात उमेदवार दिल्यानं संजय निरुपम नाराज झाले आहेत. त्यामुळं त्यांनी थेट पक्षाला अल्टिमेटम दिलाय. संजय निरुपम काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसंच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं संजय निरुपम यांच्याविरोधात मोठा निर्णय घेण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.
आजच्या बैठकीत रणनीती : लोकसभा निवडणूक देश, संविधानासाठी महत्त्वाची आहे. देशातील केंद्र सरकार हटवण्याची भूमिका घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून रणनीती तयार केली आहे. विविध विषय, रणनीती, प्रचार कसा करायचा यावर आज चर्चा झाली. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेतून लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही लोकांच्या समस्या समजून घेतल्या. घरोघरी जाऊन 25 मुद्द्यांवर आम्ही फेकूगिरी, जुमलाबाज लोकांना सत्तेवरून हटवून लोकशाही निर्माण करण्याचा निर्धार केला आहे, असं नाना पटोले म्हणाले. भाजपानं काँग्रेस पक्षाचा हमी शब्द चोरल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे. काँग्रेसचे सरकार येताच जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव राहुल गांधींनी मांडला आहे. विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. जनता लोकसभा निवडणूक स्वत:च्या हातात घेणार असल्याचं दिसतंय, असं पटोले यांनी म्हटलंय.
संजय निरुपम यांचं नाव हटवलं : आम्ही काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरुपम यांचं नाव काढून टाकलं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांनी कोणत्या पक्षात तसंच कुठं जावं हा त्यांचा निर्णय आहे, असंही पटोले म्हणाले. संजय निरुपम सुपारी घेऊन वक्तव्य करीत असून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईला सुरवात झालीय. आज रात्री त्यांच्याविषयी निर्णय घेतला जाईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यांना कोणतीही नोटीस देणार नसून ऑन द स्पॉट कारवाई करणार असल्याचंही पटोले म्हणाले.
तीनही जागांसाठी आज होणार निर्णय : सांगली, मुंबई तसंच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तीनही जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. महाविकास आघाडीची आज बैठक होत असून या तीन जागांवर आज चर्चा होणार आहे. चर्चेनंतर आज सायंकाळपर्यंत तिन्ही जागांचा निर्णय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नितीन गडकरींवर कारवाई करा : आचारसंहितेचं पालन न करता भाजपाचे उमेदवार सत्तेच्या जोरावर आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून नितीन गडकरींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
बैठकीला सर्व नेते उपस्थित : मुंबईतील टिळक भवनातील काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष सतेज पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन, प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.
हे वाचलंत का :
- श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची खेळी, 'या' महिला उमेदवाराला कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी - Lok Sabha Election 2024
- डॉ. ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट, बीडमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा - Lok Sabha election 2024
- एकनाथ खडसे यांची लवकरच 'घरवापसी', भाजपात परतण्याचे दिले संकेत - Lok Sabha Election 2024