नागपूर Congress On Draught Situation : मे महिना चांगलाच तापलेला आहे. मान्सून सुरू होण्यास काही अवधी शिल्लक आहे; मात्र, राज्याच्या प्रत्येक भागालाचं दुष्काळाच्या प्रचंड झळा बसू लागल्या आहेत. अनेक भागात तर पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यभर अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेते विभागीय स्तरावर दुष्काळी पाहणी दौरे करणार आहेत.
कॉंग्रेसकडून दुष्काळ पाहणी समिती : राज्यभरात आता निर्माण झालेली दुष्काळाची भीषणता पाहता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करून सरकार कडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे.
यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करेल : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. विदर्भातील नागपूर विभागासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांकडे दुष्काळ पाहणी समितीची जबाबदारी असेल. अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील समिती पाहणी करेल तर उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीची अध्यक्षता करतील. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती काम करेल. याशिवाय कोकण विभागासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
दुष्काळी स्थिती विरोधात समीर सत्तारांचा मोर्चा : राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ असूनही सरकारनं त्याची दखल न घेतल्यानं चक्क मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याच मुलानं मतदारसंघात 11 नोव्हेंबर, 2023 रोजी मोर्चा काढल्याचं समोर आलं. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करावा या मागणीसाठी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
समीर सत्तारांचा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी देखील आंदोलन जाहीर केलं होतं. मात्र सरकारनं काही परिमंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करून, इतर परिमंडळांचा लवकर समावेश होईल असं आश्वासन दिल्यानं आंदोलन रद्द करण्यात आलं. तर दुसरीकडे सत्तार यांच्या आंदोलनामुळे शिंदे गटाचा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तर नसावा अशी चर्चा आता रंगली होती.
हेही वाचा :
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case
- ''मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा...''; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींबाबत काय म्हटलं? - Lok Sabha Elections 2024
- अल्पवयीन मुलीकडून पित्यासह चिमुकल्या भावाची हत्या, 72 दिवसानंतर पोलिसांनी प्रकरणाचा कसा लावला छडा? - Jabalpur Double Murder Case