मुंबई Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं पहिली यादी शनिवारी जाहीर केली. मात्र भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकाही महाराष्ट्रातील नेत्याचा समावेश नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचवल्या आहे. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आहे, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली आहे. तर महायुतीतील आपसातील लढाईमुळं भाजपाचा पराभव अटळ आहे, असं मत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलं आहे.
भाजपाची पहिली यादी जाहीर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून शनिवारी 195 उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीकडं लक्ष दिलं तर विद्यमान केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. या जम्बो यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या यादीवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.
महायुतीतील आपसातील लढाईमुळे पराभव निश्चित - अतुल लोंढे : "भाजपानं 195 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यात सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील नावं आहेत. मात्र देशात दुसऱ्या नंबरच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात मात्र एकही नाव जाहीर करता आलं नाही," असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपावर टीका केली आहे. "शिरूर, जळगाव, अमरावती आणि बारामती या मतदार संघात युतीतील पक्षात लढाई आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर न करणं म्हणजे गृहमंत्री शाह आणि पंतप्रधान मोदी हारलेले आहेत, हे स्पष्ट होते. यांच्या आपसातील लढाईमुळं यांना लोकांनी नाकारलं असून यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होणं हे निश्चित आहे," असा टोला काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी लगवला आहे.
भाजपा महाराष्ट्रात शाश्वत नाही - महेश तपासे : "भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली, यात राज्यातील एकाही नावाचा समावे्श करण्यात आला नाही. याचाच अर्थ असा आहे की, महाराष्ट्रात भाजपा शाश्वत नाही, की महाविकास आघाडीला हरवू शकेल," असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले आहेत. तसेच "महाराष्ट्र हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षासोबत आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "आमच्यातून फुटून भाजपात गेलेल्यांना येणाऱ्या काळात निवडणुकीला पराभवाचा सामना करावा लागेल. म्हणून भारतीय जनता पार्टीनं आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव घेतलं नाही असा," दावा तपासे यांनी केला आहे.
हेही वाचा :