मुंबई Assembly Elections Interested Candidates : काँग्रेस पक्ष सध्या सत्ताधारी नसला तरी लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणूक जवळ येताच पक्षाला 'अच्छे दिन' आले आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला आता निधीची कमतरता भासणार नसल्याची चिन्हं आहेत. काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. अर्ज आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातून अंतिम उमेदवार निवडला जाणार आहे. तर इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट होती.
किती अर्ज दाखल? : राज्यातील विधानसभेच्या 288 जागांवरील जवळपास 2500 हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडं उमेदवारीसाठी अर्ज केले. या अर्जाच्या विक्रीतून काँग्रेसला कोट्यवधी रुपयांचा पक्षनिधी गोळा करण्यात यश मिळालंय. काँग्रेसनं या अर्जांसाठी खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी 20 हजार तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचा पक्षनिधी निश्चित केला होता. त्यानुसार इच्छुकांनी केलेल्या अर्जाच्या खरेदीतून काँग्रेसच्या तिजोरीत जवळपास कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलीय.
कोणत्या मतदारसंघातून अधिक उमेदवार? : काँग्रेसचे विद्यमान आमदार असणाऱ्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा आकडा कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. तर प्रत्येक मतदारसंघात सरासरी 8 ते 10 इच्छुक उमेदवारांची संख्या आहे. विशेषतः 57 राखीव मतदारसंघात इच्छुकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात एका मतदारसंघातील इच्छुकांची संख्या 15 ते 20 च्या घरात असल्याचं अतुल लोंढे यांनी सांगितलंय.
जाणूनबुजून अर्जाची किंमत जास्त : इच्छुक उमेदवारांसाठीच्या अर्जाच्या किंमतीबाबत बोलताना लोंढे म्हणाले की, "पक्षानं मुद्दामच अर्जाची किंमत जास्त ठेवली होती. पण तरीही खूप इच्छुकांनी अर्ज घेतले. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांतील 200 हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यात उच्चशिक्षितांसह महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसचे विद्यमान 45 आमदार वगळता 50 ते 60 जागांसाठी इच्छुकांमध्ये कमालीची चुरस असल्याचं या अर्जावरुन दिसून आलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेसनं राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 17 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर त्यांचा विजय झाला. यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय. या यशामुळं काँग्रेसनं आगामी विधानसभा आक्रमकपणे लढवून अधिकाधिक जागा जिंकण्याचा संकल्प केलाय", असं लोंढे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- 'बारामतीत मला रस नाही'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धक्कादायक माहिती, विधानसभेबाबत सूचक विधान - Ajit Pawar On Assembly Election
- देवेंद्र फडणवीस होणार श्रेय-अपश्रेयाचे धनी; भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार फडणवीसांकडे - Devendra Fadnavis
- लागा तयारीला; राज्यात दिवाळीनंतर फुटणार विधानसभा निवडणुकीचे फटाके? - Maharashtra Assembly Election 2024