मुंबई Mahavikas Aghadi - लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युवा पिढी भाजपा आघाडीला टक्कर द्यायला सज्ज झालेली आहे. या तिन्ही घटक पक्षांच्या युवा कार्यकर्त्यांचा पाहिला मेळावा मुंबई मधे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या तयारीचा वेग वाढविला आहे. या निवडणुकीत नवमतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी युवा नेतृत्त्व सरसावले आहे. यासाठी महाविकास आघाडीने आता याची जबाबदारी त्या-त्या पक्षाच्या युवकांच्या संघटनांकडे सोपवली आहे.
नवमतदारांची जबाबदारी - लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदारांच्या 40% मतदार हे 27 ते 40 वर्ष या वयोगटातले आहेत. त्यामुळे आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक लढत असेल त्या त्या मतदारसंघात जाऊन घटक पक्षाच्या युवा संघटना सभा घेणार आहेत. युवा नेते वरुण सरदेसाई यांनी ही माहिती दिली. आम्ही सर्वच युवा पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहोत, असं सरदेसाई म्हणाले. या युवा संघटना पदाधिकात्यांचा दुसरा मेळावा येत्या 9 मार्चला दक्षिण मुंबईमध्ये होणार आहे, असंही सरदेसाई यांनी सांगितलं.
बेरोजगारीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरणार - बुधवारी आयोजित या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई, युवक काँग्रेसचे अखिलेश यादव, कुणाल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मातेले, मेहबुब शेख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईत झालेल्या या मेळाव्यात या तिन्ही युवक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना आमंत्रित केलं गेलं होतं. या युवा पदाधिकाऱ्यांना लोकसभेसाठी विशेष जबबादारी देण्यात आली. यात प्रामुख्याने वाढती बेरोजगारी आणि इतर अनेक मुद्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखली गेली. त्याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीकरता रणनिती आखण्यासाठी या बैठकीत विचारविनिमय केला गेला. या मेळाव्याला इतरही अनेक संघटनांचा पाठिंबा मिळाला असल्याचं सरदेसाई म्हणाले. या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील युवकांना एकत्र आणण्याचा महाविकास आघाडीचा मानस असल्याचं सरदेसाई म्हणाले.
हे वाचलंत का...