ETV Bharat / state

मनोहर जोशींच्या आयुष्यातील 'हे' पैलू तुम्ही कधीही ऐकले नसतील, वाचा खास लेख - मनोहर जोशी लेख

Special Story Manohar Joshi : शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. मनोहर जोशी यांच्या जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसलाय. तसंच प्रत्येक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. 'ईटीव्ही' भारत महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांनी मनोहर जोशी यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या पैलूंवर तसंच त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकलाय.

ETV Bharat Special Story Manohar Joshi know the untold story about Manohar Joshi life
मनोहर जोशी यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे काही खास क्षण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 6:21 PM IST

Updated : Feb 24, 2024, 2:19 PM IST

मुंबई Special Story Manohar Joshi : देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक डॉ. मनोहर जोशी यांचं आज (23 फेब्रुवारी) पहाटे निधन झालं. खरंतर काल त्यांची तब्येत अत्यवस्थ असल्याचं आणि त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल केल्याची बातमी कळली होती. रात्री उशिरा त्यांची तब्येत अधिक गंभीर झाल्याची बातमी मिळाली आणि काळजाचा ठोका चुकला. काहीतरी अभद्र वार्ता कळणार, याची जाणीव झाली. दुर्दैवाने अभद्र बातम्या क्वचितच अफवा ठरतात. आज भल्या पहाटे मनोहर जोशी 'सर' यांचं निधन झाल्याची बातमी कळली आणि त्यानंतर काही क्षण सुन्न मनःस्थितीत गेले. डोळ्यांसमोरुन पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या आठवणींचा पट झरझर सरकायला लागला. !

चाणाक्ष आणि हजरजबाबी

मनोहर जोशी हे माझा पत्रकारितेचा प्रवास सुरु झाल्यानंतर मी पाहिलेले पहिले मुख्यमंत्री. त्यांच्या 'चाणक्य' नीतीचे, दुपारी कंपल्सरी एक तास वामकुक्षी घेण्याचे अनेक किस्से मी ऐकले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या कानपिचक्या मला ऐकूच गेल्या नाहीत, हे चेहऱ्यावर निरागस भाव आणत म्हणणारे जोशी सर मी पाहिले. पण खरं सांगतो. मला त्यांची प्रतिभा, वक्तशीरपणा, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणाचा कायम आदर वाटत आला. लोकसभा अध्यक्ष म्हणून कामकाज चालवणारे मनोहर जोशी पाहिले म्हणजे त्यांना लोकांनी प्रेमादराने दिलेल्या 'सर' या उपाधीची सार्थता पटून जात असे. सरांना असंख्य वेळा भेटण्याची, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या मुलाखतीतून हमखास काहीतरी 'एक्स्लुसिव्ह' माहिती मिळत असे. प्रश्न विचारल्यानंतर टिपीकल नेत्याच्या शैलीत "त्याचं असं आहे," "तुम्हाला सांगतो," वगैरे छापाची विधानं न फेकता ते थेट प्रश्नाचं उत्तर देत असत. अडचणींच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा व्यासंग, बुद्धिमत्ता, मुत्सद्दीपणा, सुसंस्कृतपणा, हजरजबाबीपणा किंवा विनोदबुद्धीची वारंवार प्रचिती मिळत असे.

मला वाटतं सन 2000 असावं. अमरावतीत शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू होतं. मनोहर जोशी यांचं भाषण ऐन रंगात आलं होतं. बोलताना त्यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा विषय काढत 200 कोटी रुपयांचा उल्लेख केला. बाजूला बसलेल्या नारायण राणे यांनी जोशी 200 नाही 400 या अर्थाने चार बोटं सरांनी दाखवली. त्यावर निमिषार्धात जोशी स्टेजवरच म्हणाले,"आमचे राणे हुशार आहेत. 200 चे 400 कधी करतील, कळणार नाही." समोरुन दाद म्हणून अक्षरशः हास्यकल्लोळ!

मनोहर जोशी सरांसोबत सचिन परब
मनोहर जोशी सरांसोबत सचिन परब

सरांच्या विनोदबुद्धीची चुणूक दाखवणारा एक प्रसंग. सर लोकसभेचे अध्यक्ष असताना मी तेव्हा काम करत असलेल्या राष्ट्रीय वाहिनीत त्यांची लाइव्ह मुलाखत घेत होतो. मुलाखतकर्ता मी, पाहुणे मनोहर जोशी आणि दिल्लीतल्या स्टुडिओतून प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवणारी अँकर असं कार्यक्रमाचं स्वरुप होतं. स्टुडिओत बऱ्यापैकी गोंगाट होता. त्यामुळे अँकरने विचारलेला प्रश्न सरांना ऐकू गेला नाही. दोनदा प्रश्न विचारल्यावर सर पटकन म्हणाले,"अहो, तुमच्या बाजूनं एवढा गोंगाट आहे की क्षणभर मला वाटलं की मी टीव्ही स्टुडिओत नाही तर लोकसभेत आहे." हे साधंसं वाक्य ऐकणाऱ्याला खुदकन हसवून गेलं.

कंजूस नव्हे काटकसरी

रायगड जिल्ह्यातल्या (तेव्हाचा कुलाबा) नांदवी गावातल्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेले मनोहर जोशी वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत भिक्षुकी करत होते. आयुष्यभर हेच करत राहायचं नाही, हे त्यांनी पक्कं ठरवून ठेवलं होतं. त्यामुळे एका रुग्णालयात नोकरी करणं असो, गोल्फबॉय म्हणून काम करणं असो किंवा काही काळ प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करणं असो, 'आपलं ध्येय हे नोकरी नाही, व्यवसाय करणं' हे आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधून ठेवली आणि त्यानुसार मार्गक्रमण सुरू ठेवलं.

भविष्यात 'कोहिनूर' उद्योग समूहाचा अफाट पसारा उभा करण्याची ही सुरुवात होती. अब्जावधी रुपयांच्या प्रॉपर्टीचे मालक असूनही त्यांच्यातला 'काटकसरी भिक्षुक' जागाच राहिला. ते खासदार असताना त्यांच्या मतदारसंघातल्या एका मंडळाचा अध्यक्ष त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सरांना भेटायला त्यांच्या दादरमधल्या संपर्क कार्यालयात आले. विषय होता सरांकडून नवरात्रीची वर्गणी घेणे. सरांनी सर्वांचं हसत स्वागत केलं, ख्यालीखुशाली विचारली. काही मिनिटांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यावर सरांनी,"नवरात्रीसाठी वर्गणी कशी नाकारणार? द्यायलाच हवी आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त द्यायला हवी," म्हणत चेकबुकवर आकडा लिहायला घेतला. "गेल्या वर्षी तुम्हाला एक हजार एक रुपये वर्गणी दिली होती, नाही का? मग या वर्षी... सर हे म्हणत असताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा कमालीचा उजळला होता. त्यानंतर सरांनी..."यावर्षी एक हजार अकरा रुपये वर्गणी देतो" म्हणत त्यांच्या हातात चेक दिला. झालं! सर्व पदाधिकाऱ्यांचे उजळलेले चेहरे चेक हातात घेताच अक्षरशः पाहण्यासारखे झाले.

कधीकधी त्यांच्या काटकसरी स्वभावाचं कौतुक वाटत असे. मुख्यमंत्री असताना कोकणातल्या देवरुखमध्ये शिवसेना आमदार रवींद्र माने यांनी बांधलेल्या शाळेच्या उद्गाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सरांनी कार्यक्रम संपल्यावर तिथून निघताना त्यांना कार्यक्रमात मिळालेले हार-तुरे त्यांच्या गाडीत भरुन ठेवायला सांगितले होते. हे करण्याचं कारण विचारला असता ते म्हणाले,"इथून पुढे ज्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही. त्यामुळे त्यांनी हार-तुऱ्यांसाठी खर्च करु नये, असं मी त्यांना सांगून ठेवलं आहे. हेच हार, पुष्पगुच्छ त्यांना दिला म्हणजे त्यांना खर्चही होणार नाही आणि शिष्टाचारही पाळला जाईल." कार्यक्रमाच्या आयोजकांचा इतका विचार किती नेतामंडळी करत असावेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोहर जोशी आपल्या मतदारसंघातल्या विकासकामांच्या बाबतीत कोणतीच तडजोड करीत नसत.

manohar joshi
मनोहर जोशी यांच्यासमवेत manohar joshiईटीव्ही भारत महाराष्ट्रचे संपादक सचिन परब

'सडेतोड' मनोहर जोशी

महानगरपालिका, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या संविधानाच्या धर्मक्षेत्रात मनोहर जोशी यांनी लोकशाही नावाच्या दैवताची समरसून पूजा केली. नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार, लोकसभा अध्यक्ष अशा सर्व महत्त्वाच्या पदांना त्यांनी न्याय दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला ही सर्व पदं मिळाली आहेत, याची स्वाभाविक कृतज्ञता त्यांच्या ठायी होती. ही कृतज्ञता त्यांनी अनेक प्रसंगी व्यक्तही केली. एका मुलाखतीत सरांना याबाबत प्रश्न विचारला की, "तुम्हाला काही पदं इतरांच्या आधी मिळायला हवी होती. ती मिळायला विलंब लागला. तेव्हा नेमकं काय वाटलं?" स्पष्टवक्ता असलेल्या मनोहर जोशी सरांनी क्षणभरही न थांबता उत्तर दिलं. "मला राग आला. मी उद्विग्न झालो. असूया वाटली. पण नंतर शिर्डीच्या साईबाबांनी भक्तांना दिलेली शिकवण आठवली. सबुरी धर. मी स्वतःच्य मनाला समजवलं की माझ्यापेक्षा पात्र व्यक्तीला योग्य पद मिळालं आहे. मी सबुरी धरायला हवी. ती धरली आणि कालांतराने सर्व मोठी पदं माझ्याकडे चालत आली." क्वचित एखाद्या नेत्यानं आपल्याला न मिळालेल्या पदाविषयीची घालमेल बोलून दाखवली असती. पण सरांनी अजिबात आढेवेढे न घेता परखडपणं सत्य सांगितलं, याचं मला कौतुक वाटलं.

1995 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आलं. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या सुधीर जोशी यांचं नाव आघाडीवर होतं. सुधीर जोशी म्हणजे मनोहरपंतांचे सख्खे भाचे आणि कमालीचं निगर्वी व्यक्तिमत्व. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सुधीर जोशी यांचं नाव घोषित होण्याच्या आधी मनोहर जोशींच्या मिठ्ठास वाणीनं अशी जादू केली की, मुख्यमंत्रिपदासाठी जोशींचंच नाव जाहीर झालं. पण हे जोशी सुधीर नव्हते तर मनोहर होते. विशेष म्हणजे सुधीर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या विषयावर मी एकदा मनोहर जोशींना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते गंभीर चेहरा करत म्हणाले होते की, "राजकारणात साध्य महत्त्वाचं असतं. मी जे साध्य केलं त्यानं माझा फायदा झाला. पण कुणाचंही नुकसान नाही झालं.'' (सुधीर जोशींना मुख्यमंत्रीपदाऐवजी महसूल मंत्री हे महत्त्वाचं पद मिळालं, हा संदर्भ आहे.)

नाही म्हणू नये, कामही करु नये

हा किस्सा सुद्धा सांगण्यासारखा आहे. राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील एका प्रचंड मोठ्या नेत्यानं मनोहर जोशी यांना ते मुख्यमंत्री असताना एक काम करण्याचा आग्रह केला. विषय अर्थातच काही जणांच्या आर्थिक हितसंबंधांचा होता. सरांनी सदर नेत्याला काम होईल, निश्चिंत राहा, असा निर्वाळा देिला. काही वेळानं त्यांनी आपल्या एका सचिवाला बोलावलं आणि त्या नेत्याने सांगितलेला प्लान दाखवत, "काय केलं तर हे काम होणार नाही, हे सांगा." अशी विचारणा केली. बिचारे सचिव! त्यांनी काय केलं तर काम होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या जोशींना आवाजात थोडी जरब आणत , "काय केलं तर हे काम होणार नाही, हे सांगा."या वाक्याचा पुनरुच्चार केला. विषय सोप्पा आहे. जोशी यांना ते काम करायचं नव्हतं आणि नेत्यालाही दुखवायचं नव्हतं. त्यामुळे कागदी घोडे नाचवत त्यांनी काही दिवस त्या बड्या नेत्याला झुलवत ठेवलं. या सर्व प्रकारानंतर माझ्या मेंदूत एक तत्व घुसलंच. 'नाही म्हणू नये, कामही करु नये.' मी त्याला 'जोशीतत्त्व' असं गोंडस नाव दिलंय.

बलस्थानांची जागा घेतली कच्च्या दुव्यांनी

मनोहर जोशी म्हणजे राजकारणातील 'चाणक्य'! त्यांच्या प्रखर बुद्धीचे, तल्लख स्मरणशक्तीचे आणि नेमकं बोलण्याचे गोडवे पार दिल्लीपर्यंत गायले जातात. त्यांनी देशभरात मैत्रही जपलं. उगीच नाही, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपानं शिवसेनेला आणि शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना संधी दिली. मनोहर जोशी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अगदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अगदी प्रकाश आंबेडकरांनीही थोडक्यात सर्व मराठी खासदारांनी सही केली. असो. ते लोकसभा अध्यक्ष असताना लोकसभा सभागृह अगदी मास्तरांच्या शिस्तीत चालत असे. त्यांनी माध्यमांजवळ दिलेल्या प्रतिक्रियाही हेडलाइन्स बनत. नंतर मात्र काहीतरी बिनसत गेलं.

वाढत्या वयानुसार मनोहर जोशींना काही व्याधी जडल्या. त्यांच्याकडून चुकून त्यांच्या पक्षाधोरणाच्या विरोधात जाणाऱ्या बाइटस् वृत्तवाहिन्यांना दिले जाऊ लागले. तल्लख बुद्धिमत्तेच्या 'चाणक्य'ला वयोपरत्वे अनेक बाबींचं विस्मरण होऊ लागलं. टीआरपीसाठी काहीही करायला तयार मोजक्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी यात ब्रेकिंग न्यूजचं मूळ दिसलं. तर अनेकांनी सरांच्या वार्धक्याचा मान ठेवत संवेदनशील विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया घेणं कमी आणि नंतर बंद केलं. नाही म्हणायला ते दरवर्षी गणेश चतुर्थीला माध्यम प्रतिनिधींना भेटत. पण तेवढंच. सन 2019 मध्ये मला अतिशय प्रतिष्ठेचा 'मुंबै गौरव पुरस्कार' त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबईतल्या रवींद्र नाट्यगृहात हा सोहळा रंगला. त्यांच्याशी अगणित वेळा भेटीगाठी झालेल्या असल्यामुळे कार्यक्रमाआधी त्यांच्याशी मस्त गप्पा रंगल्या. माझ्या कुटुंबीयांशी विशेषतः माझी लेक उर्वी हिच्याशी त्यांनी संवाद साधला. तिला आशीर्वाद दिले. सगळं काही ठीक आहे, असं वाटत होतं. पण नंतर विस्मृती नावाच्या खलनायकानं काम सुरु केलं. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर, तो संपताना ते माझ्याकडे शून्य नजरेने पाहत राहिले. जाताना माझ्याशी चक्क अपरिचीतासारखं 'अहोजाहो' च्या आदरानं बोलले. तेव्हा नकळत माझे डोळे पाणावले. आज पुन्हा तेच घडतंय. सरांच्या स्वभावाचे पैलू, त्यांची भाषणं, त्यांची मिश्किली आठवतेय आणि पुन्हा... पुन्हा डोळे... या खेपेस आसवांची धार लागलीय.

हेही वाचा -

  1. गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात
  2. "संकटकाळातही बाळासाहेबांच्या सोबत असणारे एकनिष्ठ शिवसैनिक"; मनोहर जोशींना उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली, बुलडाणा दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना
  3. मनोहर जोशींच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Last Updated : Feb 24, 2024, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.