मुंबई CM Eknath Shinde : 'इंडिया' आघाडीची मुंबईत जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना 'तमाम हिंदू बांधव' असा उल्लेख केला नाही. त्यामुळं आता यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. तसंच इंडिया आघाडीच्या सभेतील भाषणातून केवळ व्यक्तीद्वेष दिसला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राहुल गांधींवर टीका : 'इंडिया' आघाडीच्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते पंतप्रधानांचा व्यक्तिद्वेष करत आहेत, त्यांना ते शक्ती म्हणत असले तरी त्यांना वास्तविक हिंदुत्वाची शक्ती म्हणायचं आहे. हिंदुत्वाची शक्ती संपवणारा अजून कोणी जन्माला आला नाही, असं मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले.
फारुख अब्दुल्लांसोबत बसताना लाज वाटली नाही का? : "ज्या मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना शिवसेनेनं सातत्यानं विरोधक मानलं, त्या अब्दुल्ला यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसताना यांचे हिंदुत्व कुठे गेले? यांना लाज वाटली नाही का?" असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलाय. "त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली म्हणूनच आम्ही त्यांना सोडले. त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडली आहे, आता ते 'गर्व से कहो हम हिंदू है' असं म्हणू शकतात का?" असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. "आता माझ्या 'तमाम हिंदू बांधवांनो' हा शब्दसुद्धा कालपासून बंद झालेला आहे. त्यांनी सर्व हिंदू बांधवांचा अपमान केलाय. त्यांनी सर्वांची माफी मागायला पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले. "अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी आपण काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा विचार करत होतो मात्र जर त्याला फारूक अब्दुल्ला विरोध करत असतील तर त्यांची वृत्ती काय आहे ते समजून येते," असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
विरोधकांकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही : "शिवाजी पार्कवर जमलेले सर्व नेते आणि त्यांचे पक्ष हे निराशेने ग्रासलेले आहेत. त्यांच्यात जराही हिंमत आणि आत्मविश्वास नाही. अशा लोकांना घेऊन हे काय लढणार? राजाचा जीव 'ईव्हीएम'मध्ये आहे, असे विरोधक म्हणताना त्यांनी आपला पराभव आताच मान्य केलाय, हे स्पष्ट होतं," असं मुख्यमंत्री म्हणाले.
हिंदुत्वाची शक्ती संपवणारा जन्माला यायचाय : "शिवाजी पार्कवरील भाषणात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा शक्ती असा उल्लेख केला. मात्र, हा केवळ त्यांचा व्यक्तीद्वेष आहे. भाषणातून केवळ एका व्यक्तीविरोधातला द्वेष दिसला," असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना हिंदुत्वाची शक्ती असे म्हणायचं होतं असं म्हटलंय. "हिंदुत्वाची शक्ती ही नारीशक्ती आहे, ती भारतमाता शक्ती आहे, ही शक्ती तुम्ही संपवणार का?" असा सवाल करत हिंदुत्वाची शक्ती संपवणारा अजून जन्माला यायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
जागावाटपाचा निर्णय लवकरच : "महायुतीतील जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाणार असून, महायुतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा मतभेद नाही. सर्व समन्वयानं एकत्र आलेले आहेत, त्यामुळं जागावाटपसुद्धा समन्वयानं होईल आणि राज्यात आम्ही 45 चा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू : "मराठा आंदोलनामध्ये झालेल्या हिंसक कारवायांमधील जे गुन्हे गंभीर नव्हते, असे गुन्हे मागे घेण्याबाबत यापूर्वीच सरकारनं निर्देश दिले आहेत. मात्र, सरकारी मालमत्ता आणि खुनाचा प्रयत्न यासारखे जर काही गंभीर गुन्हे असतील तर त्याचे वर्गीकरण केले जात आहे. त्याची छाननी सुरू आहे. त्या संदर्भातही सरकार लवकरच कारवाई करेल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Manoj Jarange Patil : तर सरकारवर पश्चातापाची वेळ आणेल, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
- Seat sharing of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं ठरेना, वाचा कुणाला पाहिजे कोणती जागा, कसा सुटणार तिढा
- Uddhav Thackeray Speech :"खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार", उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल