मुंबई CM Eknath Shinde On Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असलेला प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. या कोस्टल रोडचं (Coastal Road) लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोस्टल रोडच्या झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु, सुधाकर शिंदे उपस्थित होते. कोस्टल रोड हा लवकरच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
कोस्टल रोडचे 95 टक्के काम पूर्ण : यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कोस्टल रोडची पाहणी केली आहे. कोस्टल रोडचं 95 टक्के काम पूर्ण झालं आहे. लवकरच याचं उद्घाटन करण्यात येईल. येथे सायकल ट्रॅक सुद्धा आहे. त्यामुळं या सायकल ट्रॅकचा लोकांना फायदा होईल. तसंच इथल्या कोळी बांधवांची मागणी होती की, बोटींसाठीचा स्पॅन वाढविण्यात यावा. जो स्पॅन 60 मीटरचा आहे तो वाढवला पाहिजे. ती मागणी आम्ही मान्य करून 120 मीटरचा स्पॅन वाढवला आहे. स्पॅनमुळं वादळ वाऱ्यात बोटींना काही होणार नाही, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर तयार आहे, त्यालाही विलंब होणार नाही.
जागतिक दर्जाचा प्रकल्प : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोस्टल हायवे हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. कोस्टल रोडचा दुसरा टप्पा मे महिन्यात पूर्ण होईल. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण काळजी कोस्टल रोडमध्ये घेण्यात आली आहे. कोणताही अपघात झाला तर त्याला कसं सामोरं जायचं, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, याचीही खबरदारी घेतली आहे. संपूर्ण कोस्टल रोडमध्ये दहा ठिकाणी क्रॉसिंग आहे. दोन ठिकाणी वाहनांसाठी क्रॉसिंग आहे आणि आठ ठिकाणी माणसांसाठी क्रॉसिंग असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईकरांना वाहतूक कोडींतून दिलासा : कोस्टोल हायवेमुळं मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना, सामान्य लोकांना दिलासा मिळेल. तसंच याचा फायदाही लोकांना होईल. महत्त्वाचं म्हणजे या कोस्टल हायवेमुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीतून लोकांची सुटका होईल. त्यामुळं संपूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे. दरम्यान, कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रथमच कोस्टल रोडवरुन प्रवास केला.
विरोधकांवरही मोफत उपचार होईल : कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरळीतील 'आपला दवाखाना' याची पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, चांगली कामं आणि विकासकामं होत असल्यामुळं विरोधकांना पोटदुखी होत आहे. पण जर त्यांना पोटदुखी होत असेल तर त्यांच्यावर देखील आपला दवाखान्यात मोफत उपचार करण्यात येतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. तसंच मी विरोधकांना कामातून उत्तर देतो. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळं त्याचा डबल फायदा होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा -