मुंबई Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा एनडीएच सरकार स्थापन झालx आहे तर अगदी काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्याआधी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकून पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं. विरोधकांनी बहिष्काराबाबत सांगितलेल्या कारणांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला : विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाला महायुती सरकारचे निरोपाचे अधिवेशन असल्याची टीका केलीय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निरोप द्यायचा का? हे जनतेच्या हातात असतं. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रकारे चहापानावर तुम्ही बहिष्कार टाकला तसा अधिवेशनावरही टाकणार का? या निरोपाच्या अधिवेशनाला येणार की ते ते देखील फेसबुक लाईव्ह पाहणार असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांची चर्चा करायची तयारी नाही. पत्रातही नवीन मुद्दे नाही. तेच तेच मुद्दे. सभागृहात आमची चर्चा करण्याची तयारी आहे. खोटे बोलून, लोकांची दिशाभूल करून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची अशी विरोधकांची अवस्था झाली. खोटे नरेटिव्ह तयार करून थोडं यश लोकसभेत आलं. काही प्रमाणात क्षणिक आनंद मिळाला असेल; पण सगळं करूनही काँग्रेसला 99 जागाच मिळवता आल्या.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली महायुतीची विकासकामे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे. त्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आमची तयारी आहे. आम्हाला वाटलं मतदारसंघातली कामं, चर्चा महत्त्वाचे विषय घेतील. संविधान कधी बदलणार आहात का? यावर, आपलं संविधान जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे कधीही संविधान बदल केला जाणार नाही. उलट बाबासाहेबांना काँग्रेसनं हरवलं होतं. मोदी सरकारने लंडनमधलं घर स्मारक बनवलं. इंदू मिलच्या ठिकाणी स्मारक उभारलं जात आहे. आम्ही खरीपाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत. एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा. त्यामुळे आता सगळे जागरूक झालेले आहेत. सरकारची भूमिका स्पष्ट असून मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय केला जाणार नाही. जुन्या नोंदी होत्या त्यांना देखील ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहेत. सेन्ट्रल पार्क आपण करतोय, रेसकोर्स ठेवत आपण जागा घेतली. त्याला गार्डन म्हणून आपण वापरणार. कोस्टलचं १८० एकर आणि १२० एकर असे ३०० एकरचे गार्डन उभारणार आहोत. आम्ही मुंबईचं सुशोभिकरण करतोय. तसंच रेसकोर्सवर बांधकाम होणार नाही याची नोंद घ्यावी. ३०० एकरचं गार्डन होणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
येणारं अधिवेशन विकासाला बळ देणारं - फडणवीस : आम्ही ड्रग्ज विरोधात लढाई सुरू केलीय, कारवाई सुरू केलीय. त्यामुळे साठे सापडत आहेत. पोर्शेची दुर्घटना दुर्दैवी होती; मात्र कडक कारवाई आम्ही करतोय. जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरं दिलीत. विधानसभेत देखील उत्तरं देण्याची तयारी आहे; मात्र एक बोट आमच्याकडे उगारल्यावर चार त्यांच्याकडे निघतात. कोरोना काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी यांनी खाल्लं. विरोधी पक्षाने यावर चर्चा करावी. हंगामा करायचा आणि मीडियात बोलायचं. आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं याची उत्तरं आम्ही देऊ. अधिवेशनात सत्ता पक्ष तयारीत आहे, उत्तरं देऊ. येणारं अधिवेशन विकासाला बळ देणारं ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ - अजित पवार : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रथेप्रमाणे सर्वांना चहापाण्याचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांकडून दिलं जात असते. चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न सोडवले जाऊ शकतात; मात्र गेल्या काही वर्षांपासून विरोधक सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकतात आणि वेगवेगळे प्रश्न लिहून सरकारला पत्र लिहितात. त्याप्रमाणे विरोधी पक्षाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. विरोधकांकडून पत्राची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाच्या मुद्द्यावर केलीय, त्याची गरज नव्हती. त्याविषयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. श्लोकाचा उल्लेख पुस्तकात नाही. त्यामुळे त्याविषयी विरोधकांनी बोलण्याची आवश्यकता नव्हती, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलीय. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्याचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. हे योग्य नसून महाराष्ट्राला परवडणारं नाही. तसेच त्यांचं कोणीही समर्थन केलेलं नाही. आज शाहू महाराजांची १५० वी जयंती आहे. मनुस्मृतीला महाराष्ट्रात स्थान असणार नाही हे सांगू इच्छितो. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सांभाळल्यापासून अधिवेशन गुंडाळलं गेलेलं नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर राज्य सरकारकडे असून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 28 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे सर्वकाही अर्थसंकल्पात सांगितलं जाईल असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
- आधी लगीन लोकशाहीचं...; बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क - Wedding and voting
- कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाला मिळणार ५० लाखांची मदत; आमदार मनीषा चौधरी यांनी केला होता पाठपुरावा - Corona Warriors
- नीट घोटाळ्यानं जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा डागाळली, आरोपी मुख्याध्यापकाचं निलंबन, विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव - NEET Paper Leak Scame