अमरावती : बे एके बे... बे दुणे चार... असे पाढे दहापर्यंत जवळपास सर्वांनाच तोंडपाठ असतात. काही हुशार मुलांना 20-30 पर्यंतही पाढे पाठ असतात. मात्र, हेच पाढे पुढे 31, 32 असं करत थेट 38 ,39, 40 पर्यंत एखाद्याच्या तोंडपाठ असतील तर? अमरावती जिल्ह्यातल्या एका अवलियाला असे 40 पर्यंत सर्व पाढे अगदी तोंडपाठ आहेत. सरळच नाही तर 40 पर्यंतचे सर्व पाढे उलटे देखील तोंडपाठ असणारी व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण पुंड असं त्यांचं नाव असून केवळ पाढेच नव्हे, तर पाढ्यांसोबतच पावकी, निमकी, पाऊणकी ही देखील उलटी सुलटी त्यांच्या अगदी तोंडपाठ आहे. प्रवीण पुंड यांनी ही किमया नेमकी कशी साधली या संदर्भात 'ईटीव्ही भारत 'चा हा स्पेशल रिपोर्ट.
अशी साधली पाढे पाठ करण्याची किमया : "प्राथमिक शाळेत असताना शाळेत गुरुजी पाढे पाठ करायला लावायचे. पाढे पाठ करणं हे अतिशय कठीण काम होतं. माझे पाढे पाठ होत नसत. पाढे येत नसल्यामुळं शाळेत गुरुजी मार-मार मारायचे. गुरुजींच्या माराची भीती इतकी मनात बसली की, बे पासून दहापर्यंत सारे पाढे अगदी तोंडपाठ केले. हे पाढे पाठ करत असताना सरळ आणि उलटे असं सतत म्हणून पाहायचो. एक पाढा सरळ उलटा असा अनेकदा घोकंपट्टी केल्यावर तो कायम लक्षात राहायचा. अशाप्रकारे दहाच्या पुढे थेट 40 पर्यंत सर्व पाढे सरळ आणि उलटे पाठ केले. पावकी निमकी आणि पाऊणकी हे देखील गुरुजींच्या भीतीमुळंच पाठ झालं. विशेष म्हणजे ते देखील कधी उलटे आणि कधी सरळ असे वाचून पाठ केल्यामुळं ते आजही अगदी तोंडपाठ आहेत," असं प्रवीण पुंड सांगतात.
मुलगी मेरीटमध्ये उत्तीर्ण पाढ्यात मात्र बोंब : "माझी मुलगी इयत्ता दहावीला 95 टक्के गुण घेऊन मेरीटमध्ये आली. तिचा दहावीचा निकाल लागल्यावर मी तिला 13 चा पाढा म्हणायला लावला. मात्र 13 चा पाढा तिला अजिबात येत नव्हता. मुलगी परीक्षेत मेरीटमध्ये आली, मात्र तिला पाढे येत नाही, हे खरंतर माझ्यासाठी मोठं आश्चर्य होतं. माझ्याच मुलीला पाढे येत नाहीत, हे कळल्यावर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाढे येत नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे 2021 पासून मी अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्याचा सल्ला देतो," असं प्रवीण पुंड यांनी सांगितलं.
शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद : "चांदूर रेल्वे शहरातील अनेक शाळांमध्ये तसंच तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये मी स्वतः जाऊन विद्यार्थ्यांशी अनेकदा संवाद साधतो. "पाढे पाठ करा, पाढे यायलाच हवे", असं मी विद्यार्थ्यांना सांगतो. पाढे तोंडपाठ व्हावेत, यासाठी ते कधी सरळ तर कधी उलटे म्हणून पाहावं, असं मी विद्यार्थ्यांना सांगतो. खरंतर इंग्रजी शिक्षणामुळं विद्यार्थ्यांना पाढे येत नाहीत. पावकी, निमकी, पाऊणकी हा प्रकार तर विद्यार्थ्यांना माहीतच नाही. आपल्या मुलांना मात्र हे कळावं यासाठी मी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो," असं देखील प्रवीण पुंड यांनी सांगितलं.
प्रवीण पुंड यांनी व्यक्त केली 'ही' खंत : "आजच्या विद्यार्थ्यांना बाजारातून बटाटा विकत आणायला सांगितलं तर ते नक्कीच आणतील. 1 किलो बटाटा 3 रुपयाचे होत असतील, तर 2 किलो बटाटा 6 रुपयाचे होतात, असं मुलांना कळतं. मात्र भाजीविक्रेत्याजवळ पारड्यामध्ये बटाटा हे पावणेतीन किलो भरलेत किंवा सव्वा तीन किलो भरलेत, तर भाजीवाल्याला किती पैसे द्यायचे या विचारानं आजचा विद्यार्थी गोंधळतो. आजच्या विद्यार्थ्यांना पावकी, निमकी, पाऊणकी काहीही येत नाही, त्यामुळं हे असं घडतं. गंमत म्हणजे या विद्यार्थ्यांना शाळेत गणित शिकवणाऱ्या आजच्या शिक्षकांना देखील पावकी, निमकी, पाऊणकी अजिबात कळत नाही, अशी सारी बोंबाबोंब आहे" अशी खंत देखील प्रवीण पुंड यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र : "अनेक शाळांमध्ये पाढ्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये बरीच अनास्था दिसून येते. विद्यार्थी हे पाढे सोडून काहीही विचारा, असं म्हणतात. ही बाब अतिशय खेदजनक असून पाढे शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत. राज्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते कधीही पाढे विसरणार नाही, अशी पद्धत त्यांना शिकवण्याची संधी मला मिळावी. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 2018 मध्ये आणि त्यानंतर आता देखील पत्र पाठवलं," असं प्रवीण पुंड म्हणाले. शिक्षण विभागाशी देखील या संदर्भात पत्रव्यवहार झालेत, असंही प्रवीण पुंड यांनी सांगितलं. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये काही जुन्या गोष्टी मागे पडल्या. त्यामध्येच या पाढ्यांचाही समावेश होतो. नव्याची कास धरताना जुन्या काही चांगल्या गोष्टीही स्वीकारल्या पाहिजेत असं प्रवीण पुंड यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येतं.
हेही वाचा