अमरावती Summer Camp : शालेय परीक्षा संपताच मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काय करावं याचा बेत आधीच पालक आणि बच्चे कंपनी कडून आखला जातो. साधारणपणे 25 ते 30 वर्षापूर्वी मुलांना सुट्ट्या लागल्या की दरवर्षी मामाच्या गावी जावून सुट्टी घालवण्याचं हमखास ठरलंच असायचं. मुलांना मामाच्या गावाचं विशेष आकर्षण असायचं. परंतु, काळाच्या ओघात मामाचं गाव कुठंतरी हरवल्याचं दिसतंय. मामाच्या गावाची जागा आता उन्हाळी शिबीरानं घेतलीय.
उन्हाळी शिबिरातून मिळतात व्यक्तीमत्व विकासाचे धडे : गेल्या 28 वर्षांपासून पीपल्स कला मंचच्या माध्यमातुन उन्हाळी शिबिर चालवणारे सिद्धार्थ भोजने सांगतात की, शाळेला सुट्टया लागल्या की, मुलं सकाळ पासून तर दिवसभर टीव्ही पाहत राहायची. मुलांनी मैदानी खेळ खेळावेत. तसंच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी चांदुर रेल्वे सारख्या छोट्या शहरातून या शिबिराची सुरुवात केली. आमच्या संस्थेच्या माध्यमातुन आजपर्यंत अडीच हजार विद्यार्थ्यानी उन्हाळी शिबिराचा लाभ घेतलाय. राजकारण, समाजकारण, मनोरंजन, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान, नायालयीन व्यवस्थेसह इतरही बऱ्याच क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी चुणूक दाखवलीय. पूर्वीच्या काळी मुलं आपल्या मामाच्या गावी जावून खेळायची आणि रमायची. परंतु आता मात्र या शिबिराच्या माध्यमातून मामाचं गावच आम्ही इथं उभं केल्याचं शिबिर संचालक भोजने यांनी सांगितलं.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही शिकता येतं : आपल्या पाल्याला शिबिरात दाखल केलेले पालक सांगतात की, मुलांना मोबाईल गेम किंवा टीव्ही पासून दूर न ठेवता त्यांच्यामध्ये कला गुण आणि विविध कला कौशल्यं विकसित करण्याचं काम उन्हाळी शिबिरातून होतंय. नियमित शाळा सुरु असताना अभ्यासक्रम व्यक्तिरित वेगळं काही शिकता येतं नाही. परंतु, सुट्टीच्या कालावधीत अबॅकस, चित्रकला, वैदिक मॅथ आणि स्विमिंग यासारखे अन्य शिकवणी मुलांना लावता येणं शक्य आहे. त्यामुळं सुट्टया असून सुद्धा मुलांना मामांच्या गावी किंवा इतर नातेवाईका कडे पाठवणं शक्य होत नसल्याची खंत पालक भास्कर भंकाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना व्यक्त केली.
मामाच्या गावाची मजा हरवली : पुर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं अपुरी होती. नातेवाईक किंवा मामाच्या गावी अगदी वर्षातुन एकदाच जाणं व्हायचं. त्यामुळं भेटी सुद्धा सहज होत नसत. परंतु, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं माहेरची मंडळी तसंच नातेवाईक कायम संपर्कात राहतात. परंतु, मामाच्या गावी जावून राहण्याची मजा मात्र हरवून बसल्याचं काही पालकांनी सांगितलं.
हेही वाचा :