पुणे Yogi Adityanath : आळंदीत 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान 'गीता भक्ति अमृत महोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगाण गायलं.
शिवाजी महाराजांमुळे औरंगजेब त्रास भोगून मेला : गीता भक्ती महोत्सवाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता भाग्यवान आहे. तुम्हाला शेकडो वर्षांपासून संतांचे आशीर्वाद मिळत आहेत. भक्तीनं निर्माण झालेली शक्ती नेहमीच शत्रूसांठी त्रासदायक ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सत्तेला अशाप्रकारे आव्हान दिलं होतं की, तो आयुष्यभर त्रास भोगून मेला. आता त्याच्याबद्दल कोणीही विचारत नाही."
महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीची भूमी : महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. येथेच गुरू समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं. जेव्हा-जेव्हा भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम होतो, तेव्हा गुलामगिरीतून मुक्ती मिळते. 500 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज अयोध्येत प्रभू श्री रामाचं भव्य मंदिर उभारलं गेलंय. संतांच्या सहवासानं आणि पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नानं आपण सर्वजण 22 जानेवारी या ऐतिहासिक तारखेचे साक्षीदार झालो आहोत. नवीन आणि भव्य अयोध्या तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
आळंदीला येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती : योगी आदित्यनाथ म्हणाले की, आळंदीला येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. या निमित्ताने इथे येण्याचं भाग्य लाभलं. मी लहानपणी ज्ञानेश्वरी वाचली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ज्ञानेश्वरीचा उपदेश करून भक्तांना नवा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 21 वर्षात समाधी घेऊन भारताचं अध्यात्म जगभर पोहोचवण्याचे कार्य केले, असं आदित्यनाथ म्हणाले.
जिरे टोप घालून सत्कार : आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवामध्ये योगी आदित्यनाथ यांचा शिवाजी महाराजांचा जिरे टोप घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ यांच्यासह स्वामी रामदेव, श्रीश्री गोविंद महाराज, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आपल्या या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
हे वाचलंत का :