मुंबई Sanjay Raut On Chhagan Bhujbal : मराठा समाजाला नोंदी शोधून 'कुणबी' प्रमाणपत्र दिल्यानं मंत्री छगन भुजबळ प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपण 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची कबुली दिली. त्या वादात आता संजय राऊतांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाकावं, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळं संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्यात वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छगन भुजबळांचा तत्काळ राजीनामा घ्यावा - संजय राऊत : मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधून त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात आल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचंड टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद रंगला आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणावर लढा उभारावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यावर छगन भुजबळांनी आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केल्यानं संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो : एखादा मंत्री मंत्रिमंडळाच्या विरोधात भूमिका घेतो, त्या मंत्र्याला तत्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावं. मात्र मी राजिनामा दिल्यासारखं करतो, तुम्ही तो फेटाळून टाका. ही तर मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांची मिली भगत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी दिला राजीनामा : मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या वाट्यातून आरक्षण न देता, वेगळं आरक्षण द्यावं, अशी त्यांनी भूमिका घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन ओबीसींच्या आरक्षणाचा लढा उभारावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर छगन भुजबळ यांनी मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा देऊन सभेला गेल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर समाजमाध्यमात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :