पुणे Swapnil Kusale on Hindu Rashtra : दहीहंडी उत्सवाचा जल्लोष राज्यभर साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी राज्यातील गोविंदांनी दहीहंडी फोडून एकतेचा काला जनतेला वाटला. पुण्यात मात्र ऑलिम्पिकची दहीहंडी फोडून मेडल पटकावणाऱ्या आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसाळे यानं गोविंदांबरोबर जल्लोष केला. जय श्रीराम म्हणून हिंदू संस्कृतीचं भक्कमपणे रक्षण केलं, तरचं हिंदूराष्ट्र मोठं होईल, असं स्वप्निल कुसाळे यानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्याचं आवाहनही त्यानं यावेळी केलं. त्यामुळे स्वप्निल कुसळेचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
जय श्रीराम म्हणून संस्कृती पुढं नेली पाहिजे : "हिंदू संस्कृती जपली पाहिजे, जय श्रीराम म्हणून हिंदू संस्कृती पुढं नेली पाहिजे, तरच हिंदू राष्ट्र मोठं होईल. सगळ्यांनी हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं, तर हिंदू राष्ट्र पुढं जाईल. त्यासाठी आपलं आरोग्य जपा, असं मत ऑलिम्पिक मेडल विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे यानं पुण्यातील दहीहंडी उत्सवात व्यक्त केलं. स्वप्निल कुसाळे यानं केलेल्या या वक्तव्यावरुन आता वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पर्धेमुळे कधीच आपले हिंदू सण पाहता आले नाहीत : यावेळी स्वप्निल कुसाळे म्हणाला, "आजचा कार्यक्रम हा माझ्यासाठी खूपच विशेष आहे. मी या अगोदर कधीही आपले हिंदू सण बघितले नाहीत. मला स्पर्धेच्या तयारीमुळे वेळच मिळत नव्हता. आज खूपच आनंद होत आहे. आपली दहीहंडी ही मला पाहता येणार आहे आणि मी पूर्ण बघूनच जाणार आहे. हिंदूंची संस्कृती ही आपण पाळलीच पाहिजे. लहान मुलांमध्ये ही संस्कृती रुजवली पाहिजे. जेणेकरून आपलं हिंदू राष्ट्र हे पुढं मोठं होत जाणार आहे." आपण चांगलं जेवण करा आणि वेळेवर करा जेणेकरून आपलं शरीर बळकट होईल आणि आपण अजून जास्त उत्साहानं आपले सण साजरे करू, असं आवाहन देखील यावेळी स्वप्निल कुसाळे यानं तरुणांना केलं.
इतक्या वर जाऊन दहीहंडी फोडणं कष्टाचं काम : राज्यभर दहीहंडी उत्सवाचा उत्साह मंगळवारी शिगेला पोहोचला होता. यावेळी पुण्यातील भाजपा नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित दहीहंडी उत्सवात नेमबाज स्वप्नील कुसाळे याचा सत्कार केला. यावेळी बोलताना नेमबाज स्वप्निल कुसाळे यानं उपस्थित गोविंदांचा उत्साह वाढवला. स्वप्निल कुसाळे यानं यावेळी गोविंदांना आरोग्य जपण्याचा सल्लाही दिला. यावेळी बोलताना स्वप्निल कुसाळे म्हणाला, "इतक्या वर जाऊन दहीहंडी फोडणं मोठ्या कष्टाचं काम आहे. त्यामुळे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी चांगलं सकस अन्न खा. बाहेरचं काहीच खाऊ नका. आपलं आरोग्य जपा, तरच हिंदूराष्ट्र निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल". गोविंदांना आरोग्य जपण्याचा संदेश देत देशाचा आघाडीचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं बालेवाडीत तरुणांच्या काळजाचा अचूक नेम साधला. उपस्थित तरुणांची आरोग्याच्या बाबत जनजागृती केली.
72 वर्षानंतर ऑलिम्पिकची फोडली दहीहंडी : पुण्यातील दहीहंडी उत्सवाचं खास आकर्षण राहिलेल्या ऑलिम्पिक मेडल विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पुण्यातील अनेक दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. स्वप्निल कुसाळेनं गोविंदांचा उत्साह वाढवला. तर 72 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मेडलची हंडी फोडली. देशाला अभिमानचं दही चाखायला लावणारा स्वप्नील देशातील करोडो युवकांसाठी खरा प्रेरणास्थान गोविंदा बनल्याची भावना व्यक्त करत उपस्थितांनी स्वप्नीलचं कौतुक केलं. यावेळी बाणेर बालेवाडी इथल्या रहिवाशांनी नेमबाज स्वप्निल कुसाळेला पाच लाख रुपये किंमतीचा चेक दिला. यावेळी आयोजक माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले "आजची दहीहंडी ही खूप ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये ज्यानं कोणी दहीहंडी फोडली असेल, तो आपला स्वप्नील असून आज आम्हाला खूपच आनंद होत आहे. आम्ही आमच्या बालेवाडी येथील नागरिकांकडून स्वप्नील याला प्रेमाची मदत करत आहोत."
हेही वाचा :
- ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळेची पुण्यात विजयी मिरवणूक; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक - Swapnil Kusale
- "गोल्ड मेडल मिळवण्यासाठी...", स्वप्निल कुसाळे नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर - Olympic Medalist Swapnil Kusale
- 'बाप्पा'मुळंच सगळं शक्य झालं; ऑलिम्पिकपदक विजेता स्वप्निल कुसाळे 'दगडुशेठ' चरणी लीन - Swapnil Kusale