मुंबई Chandrahar Patil : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील तीन ते चार महिने विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. तसेच जागा वाटपाचे समीकरण आणि विजयाचे गणित मांडले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरू आहे. याच धरतीवर शिवसेना (ठाकरे गटाचे) लोकसभेतील पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.
तर आपण विचार करू : आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा सर्व राज्यात साजरी केली जात असताना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मुंबईत येत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला; मात्र जर पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची जबाबदारी दिली तर त्याबाबत आपण नक्कीच विचार करू, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? चंद्रहार पाटील यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आजचा दिवस गुरूंना वंदन करण्याचा : मी आज सांगलीवरून मुंबईत आलो आहे आणि आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. यानंतर मी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यानंतर माझे कुस्तीतील गुरू जे आहेत, त्यांची मी कोल्हापूर येथे जाऊन भेट घेणार आहे. त्यांना वंदन करणार आहे. आजचा दिवस गुरू पौर्णिमेचा आहे. शिष्याने आपल्या गुरूला वंदन करण्याचा दिवस आहे. शिष्याने कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचं चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.
हेही वाचा :
- तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; संजय सिंह यांचा भाजपावर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Health
- "...त्यावेळी आम्ही बारामती बारामती केलं का?"; सुप्रिया सुळे-सुनिल शेळकेंमध्ये खडाजंगी - Sunil Shelke Vs Supriya Sule
- "सुषमा आक्कांना हे कसं माहीत असणार?"; अंधारेंच्या 'त्या' टीकेला चित्रा वाघांचं प्रत्युत्तर - Chitra Wagh on Sushma Andhare