मुंबई Central Railway Special Megablock : मध्य रेल्वेवर आज (20 जुलै) शनिवारी रात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेनं जाहीर केलं आहे. कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. त्यामुळे शनिवारी काही लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील या विशेष ब्लॉकचा परिणाम हार्बर मार्गावरही होणार आहे.
'या' मार्गावर सकाळी आणि दुपारी मेगाब्लॉक : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं 21 जुलै 2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मुलुंड ते माटुंगा या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 या कालावधीत प्रभावित होणार आहे. या कालावधीत रेल्वेची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. यासह हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वांद्रे-चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पहावं असं आवाहन रेल्वेनं केलं आहे.
'या' मार्गावरील सेवा होणार रद्द : याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला स्थानका दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर : पश्चिम रेल्वेने देखील ब्लॉक जाहीर केला असून, मध्यरात्री 1 ते पहाटे 4:30 पर्यंत हा ब्लॉक चालणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. पश्चिम रेल्वेचा ब्लॉक हा सांताक्रूझ ते माहीम अप-डाऊन धीम्या मार्गावर असणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर लोकल गाड्यांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या अपुऱ्या लांबीमुळे आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावरही थांबणार नाही.
हेही वाचा:
- मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक; 'या' मार्गावर होणार परिणाम - Mumbai Local Mega Block News
- मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा! - Mumbai Mega Block
- मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक संपला; तीन दिवसांच्या ब्लॉकमधून प्रवाशांना काय मिळालं? - Central Railway Block Ends