मुंबई Madh Versova Cable Bridge : अंधेरी पश्चिम येथील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मढ वर्सोवा उड्डाणपूलाचे काम आता सुरू होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबईमध्ये उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल उभारणी महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यातच मढ ते वर्सोवा या मार्गावर केवळ फेरी बोट सेवा चालते. मात्र, ही बोट सेवा वर्षातून पावसाळ्याचे चार महिने बंद असते. त्यामुळे मढ येथून वर्सोवा येथे जाण्यासाठी नागरिकांना पश्चिम द्रूतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग या दोन मार्गांचा पर्यायी वापर करावा लागतो. यामुळे सुमारे दोन किलोमीटरच्या या अंतरासाठी 22 किलोमीटर वळसा घालावा लागतो.
प्रवासाचा वेळ वाचणार : अंधेरी ते वर्सोवा या भागात पूल व्हावा, अशी अनेक वर्षांची नागरिकांची मागणी होती. मालाड पश्चिमेचा मड परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने जोडलेला आहे. त्यामुळे या भागात प्रवासासाठी जरी बोटींचा वापर होत असला तरी जलवाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी मड ते वर्सोवा या जलवाहतूक पुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. हा पूल झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या नागरिकांना तसेच मच्छीमार बांधव आणि विद्यार्थ्यांना लाभ होणार असून, त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचे आमदार भारती लव्हेकर यांनी सांगितले.
काय आहे प्रकल्प? : मढ ते वर्सोवा सागरी उड्डाणपुलासाठी सुमारे १.५३ किलोमीटर इतके अंतर असून या अंतरातील उड्डाणपुलासाठी टेंडर नुकतेच काढण्यात आले. केबलच्या आधाराने या ठिकाणी पूल निर्मिती करण्याचे हे काम असणार आहे. मढ ते वर्सोवा या 22 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे एक तासाचा वेळ लागत होता. मात्र हा पूल पूर्ण झाल्यानंतर हे अंतर काही मिनिटात कापता येणार आहे.
तीन वर्षात पुलाचं काम होणार पूर्ण : या पुलाच्या बांधणीसाठी 'सीआरझेड'ची परवानगी मिळाल्यामुळे या पुलाच्या बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने मार्च 2024 मध्ये या उड्डाणपुलासाठी 1800 कोटी रुपयांची निविदा जाहीर केली होती. मात्र, सर्वात कमी बोली लावलेल्या 'आपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला २०२९.८० कोटी रुपयांच्या बोलीवर काम देण्यात आले. याच कामासाठी 'एनसीसी लिमिटेड' या कंपनीने 2125 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, कमी बोली असल्यामुळे आपको कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. येत्या तीन वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा - वर्सोवा-बांद्रा सागरी सेतूचा मार्ग सुकर, 9 खांबांच्या बांधकामावरील स्थगिती उठवली