बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील चार मतदारसंघ बुलढाणा, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा हे घाटावरचे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. तर खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर हे तीन मतदारसंघ घाटाखालचे म्हणून ओळखले जातात. सध्या महायुतीचे उमेदवार इथं निवडून आलेले आहेत. पण यावेळेस ही लढत थेट होणार आहे. यामध्ये कुठं दुरंगी तर कुठं तिरंगी लढत होण्याचं चित्र आहे.
बुलढाणा मतदारसंघ : बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांची थेट लढत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जयश्री शेळके यांच्यासोबत होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून शिवसेनेत (उबाठा) आलेल्या जयश्री शेळके यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. मात्र, असं असलं तरी संजय गायकवाड यांनी केलेली पाच वर्षातील विकासकामं, ग्रामीण भागातील राबवलेल्या उपाययोजना यामुळं त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
चिखली आणि खामगाव मतदारसंघ : चिखली मतदारसंघात देखील काँग्रेस विरुद्ध भाजपा असा थेट सामना होण्याची चिन्हं आहेत. भाजपाच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात लढत होणार आहे. सध्या श्वेता महाले यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय. तर खामगाव विधानसभा मतदारसंघात आकाश फुंडकर विरुद्ध दिलीप सानंदा अशी पुन्हा एकदा पारंपरिक लढत बघायला मिळत आहे.
जळगाव जामोद आणि मलकापूर मतदारसंघ : सलग चार वेळा निवडून आल्यानंतर महायुतीकडून भाजपा नेते संजय कुंटे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या स्वाती वाकेकर रिंगणात आहेत. मलकापूर मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती कमबॅक करत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकडे विरुद्ध चैनसुख संचेती असा थेट सामना असणार आहे.
कशा आहेत लढती पाहुयात-
बुलढाणा विधानसभा
- संजय गायकवाड- शिवसेना
- जयश्रीताई शेळके- शिवसेना (उबाठा)
- प्रशांत वाघोदे- वंचित बहुजन आघाडी
चिखली विधानसभा
- श्वेता महाले- भाजपा
- राहुल बोंद्रे- काँग्रेस
- गणेश बरबडे- मनसे
मेहकर विधानसभा
- संजय रायमुलकर- शिवसेना
- सिद्धार्थ खरात- शिवसेना (उबाठा)
- भैय्यासाहेब पाटील- मनसे
- ऋतुजा चव्हाण- वंचित
सिंंदखेडराजा विधानसभा
- डॉ. राजेंद्र शिंगणे-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
- डॉ.शशिकांत खेडेकर- शिवसेना
- सविता शिवाजी मुंढे- वंचित बहुजन आघाडी
- मनोज देवानंद कायंदे- राष्ट्रवादी काँग्रेस
- गायत्री शिंगणे, अपक्ष
खामगाव विधानसभा
- ॲड. आकाश फुंडकर - भाजपा
- दिलीपकुमार सानंदा- काँग्रेस
- देविदास हिवराळे- वंचित बहुजन आघाडी
जळगाव जामोद विधानसभा
- डॉ. संजय कुटे- भाजपा
- स्वातीताई वाकेकर- काँग्रेस
- प्रशांत डिक्कर- स्वाभिमानी पक्ष
- डॉ. प्रविण पाटील- वंचित बहुजन आघाडी
मलकापूर विधानसभा
- चैनसुख संचेती- भाजपा
- राजेश एकडे- काँग्रेस
हेही वाचा -