जळगाव Nepal Bus Accident : वरणगाव येथील 80 नागरिक हे नेपाळ इथं पर्यटनासाठी गेलेले होते, त्यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू इथं शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दरीत कोसळल्यानं 24 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. काठमांडू शहराच्या जवळ असलेल्या खैरनी नदीमध्ये बस कोसळून हा अपघात झाला आहे. या प्रकरणातील मृतांचे मृतदेह नेपाळवरुन भारतात आणले जाणार आहेत. 24 भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाल्यानं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळमध्ये धाव घेतली आहे. त्यांच्यासह भुसावळचे आमदार संजय सावकारे हे देखील काठमांडू इथं पोहोचले आहेत.
भाविकांची बस कोसळली दरीत :जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून 104 भाविक 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये दाखल झाला. हे भाविक तीन बसमधून प्रवास करत होते. पहिले दोन दिवस या भाविकांनी पोखराला भेट दिली. शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत कोसळली. सशस्त्र पोलीस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, "या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे नातेवाईक होते."
भावासोबतच तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा : नेपाळमध्ये ठार झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, "आम्ही अपघात होण्याच्या काही वेळा आधीच भावाशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. अयोध्याचं दर्शन झाल्यानंतर ते काठमांडूला जाणार होते. मात्र सकाळी अकराच्या सुमारास आम्हाला तिथून फोन आला आणि अपघात घडल्याची माहिती मिळाली. भावासोबत आमचा तो व्हिडिओ कॉल शेवटचा ठरला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.
या 24 भाविकांचा झाला बस अपघातात मृत्यू : नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात 24 भाविकांचा मृत्यू झाला. यात 1) रणजित मुन्ना-वाहक, 2) मुस्तफा मुर्तझा, 3) सरला राणे, 4) भारती जावळे, 5) तुळशीराम तायडे, 6) सरला तायडे, 7) संदीप सरोदे, 8) पल्लवी सरोदे, 9) अनुप सरोदे, 10) गणेश भारंबे, 11) नीलिमा धांडे, 12) पंकज भंगाळे, 13) परी भारंबे, 14) अनिता पाटील, 15) विजया जावळे, 16) रोहिणी जावळे, 17) प्रकाश कोळी, 18) सुधाकर जावळे, 19) सुलभा भारंबे, 20) सुभाष रडे, 21) सुहास राणे, 22) लीला भारंबे, 23) रिंकी राणे, 24) नीलिमा जावळे यांचा समावेश आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी गाठलं नेपाळ : नेपाळ इथं बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 24 भाविकांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळमध्ये धाव घेतली. रक्षा खडसे यांनी काठमांडू इथल्या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. लवकरच या भाविकांचे मृतदेह भारतात आणण्यात येणार आहेत. भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :