पुणे Brother Killing Sister Pune : नात्यापुढं पैसा. प्रॉपर्टीला किंमत नाही असं आपण म्हणतो. मात्र, पुण्यात अशी एक घटना घडली ज्यात पैसा, प्रॉपर्टीच सर्वकाही असल्याचं दिसून आलं. राहत्या घराच्या मालकीवरुन वारंवार वाद व्हायचे. याचा राग मनात धरुन पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका सख्ख्या भावानं आणि त्याच्या पत्नीनं 48 वर्षीय बहिणीला मारून तिचे तुकडे-तुकडे करून नदी पात्रात फेकून दिले. ही घटना पुणे पोलिसांनी उघडकीस आणली.
बहीणीची केली हत्या : बहीण-भावाचं नातं वेगवेगळ्या रुपानं आपण अनुभवतो. भाऊ बहिणीसाठी कधी हळवा होतो, तर कधी खंबीर होत तिची साथ देतो. पण, पुण्यात एका भावानं केवळ घराच्या मालकीच्या वादातून आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या करुन तिचे तुकडे करुन नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली. याबाबत चंदननगर पोलिसांनी मृत महिलेचा भाऊ अश्पाक अब्दुल खान (वय- ५१ वर्षे, रा.शिवाजीनगर) तसंच त्याची पत्नी हमीदा अश्पाक खान ( वय- ४५ वर्षे) यांना अटक केली.
मृतदेहाचे केले तुकडे : याबाबत अधिक माहिती अशी की, 26 ऑगस्ट रोजी खराडीजवळील मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृत महिलेचं वय 40 ते 50 वयोगटातील असावं असा अंदाज पोलिसांना होता. तसंच मृतदेहाचे धडापासुन शिर, खांद्यापासून दोन्ही हात, खुब्यापासून दोन्ही पाय तोडले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयित आरोपीनं मृतदेहाचे तुकडे-तुकडे केल्याचा संशय पोलिसांना होता. शिर, हात, पाय तोडून केवळ धड हे नदी पात्रात फेकून देण्यात आलं होतं.
मिसिंगच्या तक्रारींचा केला अभ्यास : दाखल गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना, पुणे शहरात तसेच पिंपरी चिचवड हद्दीत दाखल 40 ते 50 वयोगटातील महिला मिसिंगच्या घटना तपासण्यात आल्या. यात एकूण दोनशे नागरिक मिसिंग असल्याचं दिसून आलं. नदी पात्रात फेकून दिलेल्या मृतदेहाचे इतर भागांचाही तपास नदीत पाणबुडी, ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून घेण्यात आला.
असा केला तपास : या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिवाजीनगर भागातील एक महिला मिसिंग आहे. त्याची सखोल चौकशी करुन, नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला. त्यावेळी असं कळलं की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सकीना अब्दुल खान (वय- ४८ वर्षे) ही महिला शिवाजीनगर येथून 23 ऑगस्टपासुन मिसिंग झाल्याची तक्रार होती.
आरोपींनी दिली कबुली : याबाबत चंदननगर पोलीस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन मृत महिलेचा भाऊ आरोपी अश्पाक अब्दुल खान आणि त्याची पत्नी हमीदा अश्पाक खान यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या दोघांनीही बहिणीची हत्या केल्याची कबुली दिल्यानं त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिली घटनेची माहिती : "राहत्या घराच्या मालकीवरुन घरात वारंवार होत होत असल्याचा राग मनात धरून आरोपी अश्पाक अब्दुल खान यानं त्याची पत्नी हमीदा हिला सोबत घेवून बहीण सकीना खान हिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन ते नदीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली," अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
हेही वाचा
- अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case
- अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणं भोवलं; पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कुऱ्हाड - Mumbai Cops Planting Drugs
- बंदाघाटावर महिलेला बोलावलं भेटायला, मग भल्या पहाटे चाकूनं भोसकलं; विवाहितेचा खून करुन तरुणाची आत्महत्या - Man Killed Women