मुंबई Mumbai Crime News : तुम्ही विविध कामांसाठी ओळखपत्र अथवा महत्त्वाची कागदपत्रे देत असताना सावध राहा. कारण मुंबई गुन्हे शाखेनं कागदपत्रांचा गैरवापर करून अवैध सिमकार्डची विक्री करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केला. अवैध सिमकार्डची विक्री केली जात असल्याची माहिती मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ला प्राप्त झाली होती. त्यानुसार कारवाई करत बांद्रा रिक्लमेशन फ्लायओव्हरच्या खाली, लालमिट्टी झोपडपट्टीजवळ दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 9 च्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं. भावेश कमरशी गोठी (वय 29) आणि भरत रमेशभाई सुथार (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल : पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची अंगझडती घेतली. दोघांकडं 441 अवैध सिमकार्ड सापडले असल्याची माहिती कक्ष 9 चे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिलीय. तपासादरम्यान हे दोघंही गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यात असलेल्या बच्छाव गावचे असल्याचं समोर आलंय. दोन्ही आरोपींविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318 (2), 318 (4), 336 (1), 336(2), 336 (3), 340 (1), 340 (2), 3 (5) सह भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 च्या कलम 25 (C) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. अवैध सिमकार्डचा वापर देशविघातक कृत्य तसंच फसवणुकीसारख्या गुह्यात केला जातो.
मोबाईल नंबरचा वापर चुकीच्या कामांसाठी : नवीन सिमकार्ड घ्यायचं असल्यास अथवा सिमकार्ड पोर्ट करायचे असल्यास पुरावा म्हणून ओळखपत्र द्यावं लागतं. अनेकदा ओळखपत्र म्हणून आधार कार्डचाच वापर करतो. मात्र, आपलं आधारकार्ड वापरून इतर व्यक्तीनं सिमकार्ड तर घेतलेलं नाही ना? अनेकदा आपल्या नावानं कोण सिमकार्ड वापरतंय, याची आपल्यालाच माहिती नसते. सिम कार्डचा वापर करून अनेकदा ऑनलाईन फसवणूक केली जाते. तसंच आपल्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून चुकीची कामही केले जाऊ शकतात. त्यामुळं आधार कार्डची फोटो कॉपी अनोळखी व्यक्तींना देणं टाळावं.
9 पेक्षा जास्त सिमकार्ड वापरल्यास किती दंड? : केंद्रीय दूरसंचार विभागाच्या नव्या नियमांनुसार, एक व्यक्ती आपल्या आधारवरून केवळ 9 सिम खरेदी करू शकते. तसंच 9 पेक्षा जास्त सिमकार्ड बाळगल्यास सर्वप्रथम 50 हजार रुपये दंड तर या नियमांचं वारंवार उल्लंघन केल्यास 2 लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. इतकंच नाही तर चुकीच्या पद्धतीनं सिम मिळवल्यास 50 लाखांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या आधारशी किती सिम लिंक आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्या नावावर असलेले इतर सिम वापरात नसल्यास आपण ते डिस्कनेक्टदेखील करू शकतो.
हेही वाचा -