मुंबई BMC Water Issue : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या 7.14 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असून एकूण क्षमतेच्या 49 टक्केच हा पाणीसाठा आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळं उन्हाळ्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच पालिकेकडं पाण्याचा दुसरा कोणताही पर्यायी स्त्रोत नसल्यामुळं येत्या काही दिवसांत पालिका पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील तीन वर्षात सर्वात कमी पाणीसाठा : सध्याचा पाणीसाठा हा मागील तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा आहे. मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये हाच जलसाठा 54 टक्के आणि फेब्रुवारी 2022 मध्ये 57 टक्के होता. मागील वर्षी 2023 मध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाल्यानं ही स्थिती झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईकरांची सध्याची पाण्याची गरज पाहता धरणांमध्ये 1 ऑक्टोबर पर्यंत 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा राखीव ठेवणं आवश्यक आहे. तरच मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणं शक्य आहे. त्यामुळं आता पालिकेची एकूणच मदार निसर्गावर अवलंबून असून, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडणं अपेक्षित असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, पाणीटंचाईची हीच स्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी काळात भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातून पिण्यासाठी आणखी पाणी उपलब्ध करुन देण्याची विनंती पाटबंधारे विभागाला करणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय.
शहराला दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा : पालिकेला मागील वर्षी जूनमध्ये एकूण जल साठ्यांमधून अतिरिक्त 1.5 दशलक्ष लिटर पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, पाटबंधारे विभागानं पालिकेची अतिरिक्त पाणी पुरवठ्याची विनंती मान्य न केल्यास, पालिका प्रशासनाला पाणीकपात करावी लागू शकते. गतवर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं पालिकेला 1 जुलै रोजी 10 टक्के पाणीकपात करावी लागली होती. मात्र, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं तलाव भरण्यास मदत झाली, त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी कपात मागे घेण्यात आली होती. दरम्यान, मोडक सागर, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांतून पालिका मुंबई शहराला दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. त्यामुळं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होण्याची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं मुंबईकरांनी देखील पाणी जपून वापरावं अशी विनंती पालिकेकडून करण्यात आलीय.
हेही वाचा :