मुंबई Clean Up Marshals : महाराष्ट्र राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई' ठेवण्याच्या उद्देशानं मुंबई महापालिकेकडून कंबर कसली आहे. शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा 'क्लिनअप मार्शल'ची नेमणूक केलीय. त्यामुळं सावधान, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही घाण करणार असाल अथवा थुंकणार असाल तर, तुम्हाला दंड भरण्याची वेळ येऊ शकते.
डीप क्लिप मोहिम सुरु : गेल्या काही महिन्यापासून मुंबई शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेवर पडण्यास सुरूवात झाली होती. विरोधकांनी सरकारला आणि मुंबई पालिकेवर टिकेच्या माध्यमातून घेरलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'डीप क्लीन मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील रस्ते पाण्यानं स्वच्छ केले जात आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्री यांनी स्वतः पाण्याचा पाईप हातात घेऊन मुंबई मधील रस्ते स्वच्छ करताना दिसले होते.
इतका आकारण्यात येणार दंड : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी बंदी आहे, तरी काही लोकांकडून नियमांचं उल्लंघन होतं. त्यामुळं मुंबई महापालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा 'क्लीनअप मार्शल' नेमलं जाणार आहे. 24 वार्ड मध्ये 720 क्लीनअप मार्शल टप्प्याटप्प्यानं नियुक्त केले जाणार आहेत. रस्त्यावर थुंकणं, कचरा फेकणं, घाण टाकणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी 200 रुपये पासून ते एक हजार रुपये पर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.
क्लीनअप मार्शल नियुक्त : महाराष्ट्रात 2020 साली कोरोना महामारी आली होती. या काळात मुंबईत तोंडावर मास्क न घालणाऱ्यांना क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र या काळामध्ये 'क्लीनअप मार्शल'कडून बेकायदेशीर दंड वसूल केल्या जात असल्याच्या त्यांच्या विरोधात महापालिकेकडं अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळं महापालिकेनं सदर संस्थेसोबत केलेला करार रद्द केला होता. मात्र आता सर्रास मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी घाण केली जात आहे. त्यामुळं मुंबई महापालिका प्रशासनाकडून क्लीनअप मार्शल नियुक्त केली जाणार आहे.
50 टक्के उत्पन्न खाजगी संस्थेला मिळणार : सुरुवातीच्या एक ते दोन आठवडे दंडात्मक कारवाईनंतर लगेच पावती दिली जाणार आहे. मात्र यात पारदर्शकता येण्यासाठी दंड ऑनलाइन अर्थात ॲपच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. ऑनलाइन ॲप बनवण्याचं काम अंतिम टप्यात असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. क्लीनअप मार्शल नेमणूक करण्याचं काम एका खासगी संस्थेला दिलं आहे. तर आकारण्यात आलेल्या दंडापैकी 50 टक्के उत्पन्न महापालिकेला तर उर्वरित 50 टक्के उत्पन्न हे खाजगी संस्थेला देण्यात येणार आहे.
हेही वाचा -