मुंबई JP Nadda marathon meetings: चार दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याबरोबर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याबरोबर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दोन तास मॅरेथॉन बैठक घेतली.
शिंदे, फडणवीस यांच्या घरी विराजमान बाप्पाचे दर्शन - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री मुंबई बाहेर असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेत आरती सुद्धा केली. यानंतर त्यांनी मुंबई महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार इत्यादी नेते उपस्थित होते.
महायुती म्हणून एकत्र लढा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांना महायुती म्हणून एकत्र लढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये मतभेद नको. लोकसभा निवडणुकीमध्ये आपापसातील मतभेदाचा जो फटका बसला तो यंदा बसता कामा नये. सामंजस्याने प्रत्येक विषयावर तोडगा काढा. विशेष करून जागावाटप व मतदार संघ निवडताना फार बारकाईने काळजी घ्या, असं सांगत याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजवावी असंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे. चारच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतील आढावा सुद्धा जे पी नड्डा यांच्याकडून घेण्यात आला. यासोबत सरकारी योजनांचं श्रेय घेताना ते महायुती म्हणून एकत्र घ्या, त्यासाठी आपसात मतभेद नकोत हेही आवर्जून जे पी नड्डा यांनी स्पष्ट केल्याचं सांगण्यात येत आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर जे पी नड्डा यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे जे पी नड्डा सुद्धा मागील अनेक वर्षापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत. त्यानंतर जे पी नड्डा यांनी आशिष शेलार यांच्या मतदारसंघातील वांद्रे पश्चिम येथील विराजमान सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
हेही वाचा..