पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. अस असताना पुण्यातील हडपसर येथील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांच आज फुरसुंगी फाटा येथे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय? : याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील फुरसुंगी येथील सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्लु बेरीसमोर सतीश वाघ हे थांबले होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या काही लोकांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवलं आणि त्यांचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलानं तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास सुरू असतानाच संध्याकाळच्या वेळेस यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू : सतीश वाघ यांची हत्या करणारे आरोपी नेमके कोण होते? त्यांचं अपहरण करून हत्या का करण्यात आली? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
हेही वाचा