कोल्हापूर Gopichand Padalkar Controversial Statement : "राज्यातील धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल," असं वादग्रस्त विधान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं. कोल्हापुरात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी तावडे हॉटेल परिसरात 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी हे विधान केलं.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले? : कोल्हापूरमधील 'रास्ता रोको' आंदोलनात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजातील बांधवांमुळं बकऱ्याचं मटण सर्वांना मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं. "राज्यातील धनगर समाजातील लोकांनी बकरी राखायची बंद केली, तर महाराष्ट्राच्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल," असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं. "आमदारकी वैगेरे ही समाजामुळं मिळालीय, आमचं मेंढपाळ वर्षभर घरी येत नाहीत. आमची मुलं सगळ्यांच्या पाठी फिरतात. आम्हाला गुरासारखं मारलं जातंय." असंही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजबांधव उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्याकरीता आज कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला गोपीचंद पडळकरांसह जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे, अशोक कोळेकर तसंच मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव उपस्थित होते.
धनगर समाज आक्रमक : राज्यात भारतीय जनता पक्षाचे 2014 साली सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र, गेली 10 वर्ष याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी एकवटलाय. आरक्षण न मिळाल्यास आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही धनगर बांधवांनी यावेळी दिला.
हेही वाचा
- आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana
- 'शिवतीर्थ'वरील मनसेची बैठक सोडून राज ठाकरे 'वर्षा'वर शिंदेंच्या भेटीला; मुंबईत घडामोडींना वेग - Vidhan Sabha Election 2024
- "काँग्रेसकडून नाना पटोले मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार"; काँग्रेस आमदाराचा दावा - Nana Patole CM Post